
Crime News : मुंबईत वंचितच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला!
मुंबईतील दादर परिसरात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवक अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर चार अज्ञातांनी चाकू आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत.
या हल्ल्यात पक्षाचे नेते गौतम हराल हेही जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.
पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०७,३२६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, मुंबई पोलिसांनी ही माहीती दिली.
काल वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून युवा आघाडी ह्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला आहे.
दिनांक २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचितचे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार घेवून जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती वंचितच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी दिली आहे.