Mumbai : कबड्डीच्या पेपरात शिक्षकांची पोलिसांवर 7 गुणांची चढाई

कल्याणमध्ये रंगला शिक्षक पोलिस कबड्डी सामना
Kabaddi
Kabaddi sakal

डोंबिवली : चढाई आणि पकडीचे अद्भूत कौशल्य, डोळ्याचे पाते लवत नाही तोच मॅटवर होणाऱ्या हालचाली, चारही बाजूंनी चढाया करुन विरोधी गटातील खेळाडूवर होणारी चपळ अशी चढाई असा कबड्डीचा नेत्रसुखद थरार कल्याण मध्ये आयोजित कबड्डी सामन्यात अनुभवता आला. आपला कल्याण महोत्सव अंतर्गत कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

खेळाडूंच्या चपळाई सोबतच शिक्षक आणि पोलिसांत रंगलेला सामना हा या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरला. चोराला पकडण्यात पटाईत असलेले पोलिस या कबड्डीच्या पेपरमध्ये मात्र शिक्षकांवर चढाई करु शकले नाही. शिक्षकांनी मात्र पोलिसांची योग्य पकड घेत 7 गुणांची चढाई करत हा सामना जिंकला. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी या परिसरात केली होती.

कल्याण पूर्वेत आपला कल्याण महोत्सव 2023 चे आयोजन शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद कल्याणकरांना घेता आला. या महोत्सवाचे वेगळे आकर्षण होते ते म्हणजे खेळाला देण्यात आलेले प्राधान्य.

या ठिकाणी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागातील 10 संघांनी सहभाग घेतला होता. 70 वजनी गटात ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना हा नव तरुण क्रिडा मंडळ व शिव शंकर क्रिडा मंडळ यांच्यात झाला. त्यामध्ये शिवशंकरने 10 गुणांनी चढाई करत सामना जिंकला. तर दुसरा सामना हा जय बजरंग क्रिडा मंडळ व आई गावदेवी क्रिडामंडळ यांच्यात होत 3 गुणांनी जय बजरंग मंडळाने सामना जिंकला. अंतिम सामना हा जय बजरंग क्रिडा मंडळ नांदिवली व शिवशंकर क्रिडा मंडळ यांच्यात झाला. यावेळी 7 गुणांची चढाई करत शिव शंकर क्रिडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.

या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले ते शिक्षक संघ आणि कोळसेवाडी पोलिस यांच्यात रंगलेल्या कबड्डी सामन्याने. शिवसेना कल्याण पूर्वेचे शहरअध्यक्ष गायकवाड यांनी 5 हजारांचे बक्षिस जाहीर करत या विशेष सामन्यासाठी देऊ केले होते. या सामन्यात शिक्षकांनी आधीपासूनच लीड घेतली होती. दुसऱ्या फेरीत पोलिसांनी काही गुणांची कमाई करत लीड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पकड सैल पडल्याने शिक्षकांनी 7 गुणांची चढाई करत सामना जिंकला.

कल्याण पूर्वेत मॅटवर हे सामने आयोजित केले होते. आत्तापर्यंत मातीत खेळण्याचा अनुभव होता. प्रथमच मॅटवर सामना खेळलो असल्याचे शिक्षक व पोलिसांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर शिक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला होता. मुलांना प्रशिक्षण देतो, परंतू स्वतः मैदानात उतरुन खेळलो आहोत त्याला खूप वर्षांचा कालावधी उलटला आहे.

या सामन्याचे निमंत्रण आल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची टिम तयार करत आम्ही हा सामना खेळलो आणि जिंकलो असल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

हा सामना पाहण्यासाठी कल्याण पूर्वेचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com