मुंबईकर आकांक्षा सोनावणेची गगनभरारी, उत्तर ध्रुवावरून प्रवास करत विमानोड्डाणाचा आगळावेगळा विक्रम

मुंबईकर आकांक्षा सोनावणेची गगनभरारी, उत्तर ध्रुवावरून प्रवास करत विमानोड्डाणाचा आगळावेगळा विक्रम

मुंबई  : एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या टीमने अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को ते बंगलोर हा प्रदीर्घ विमानप्रवास उत्तर ध्रुवावरून करून एक आगळावेगळा विक्रम केला. या मार्गावर जगात सर्वप्रथम त्यांनी असे उड्डाण करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. या वैमानिकांमध्ये मुंबईकर आकांक्षा सोनावणे यांचादेखील समावेश आहे. 

सॅनफ्रान्सिस्को हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. सामान्यतः येथून भारताकडे येणारी विमाने अलास्का, रशिया-जपान, चीन, अग्नेय आशिया या प्रशांत महासागरावरील मार्गाने येतात. तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून येणारी विमाने सामान्यतः अटलांटिक महासागरावरून युरोप, आफ्रिका-आखाती देश या मार्गाने येतात. मात्र यावेळी प्रथमच या विमानाने हे मार्ग न घेता कॅनडावरून उत्तर ध्रुव गाठून तेथून रशिया-चीन वरून काश्मीरच्या बाजूने भारतात प्रवेश करण्याचा मार्ग चोखाळला. दुसरे म्हणजे 17 तासांच्या या प्रदीर्घ प्रवासात विमानाचे सारथ्य करणाऱ्या चौघीजणी महिला असून त्यातील आकांक्षा सोनावणे यांनी मुंबई-महाराष्ट्राची पताकाही फडकवत ठेवली आहे. 

नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी या विक्रमी कामगिरीची माहिती दिली आहे. नारीशक्तीचा हा कौतुकास्पद विक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एआय 176 क्रमांकाचे हे बोईंग 777 प्रकारचे विमान या विक्रमासाठी निवडण्यात आले. ताशी 860 किलोमीटरच्या वायुवेगाने जाताना तब्बल तीस हजार ते बत्तीस हजार फूट उंचावरून या विमानाने उत्तर ध्रुव ओलांडला. अमेरिकेहून आज सकाळी साडेआठ च्या सुमारास निघालेले हे विमान नियोजित वेळेनुसार सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बंगलोरच्या केंपेगौडा विमानतळावर आपला प्रवास संपवेल. आतापर्यंत कोणत्याही प्रवासी विमान कंपनीने या मार्गाने एवढा लांब प्रवास केला नाही, अशी माहिती एअर इंडियाने ट्वीट करून दिली आहे. 

मनःसामर्थ्य, एकाग्रता, स्टॅमिना, चिकाटी यांचा कस पाहणाऱ्या या प्रवासात कॅ. झोया अगरवाल, कॅ. पापागारी थनमाई, कॅ. शिवानी मनहास व मुंबईकर आकांक्षा सोनावणे यांनी आळीपाळीने या विमानाचे सुकाणू सांभाळले. मुंबईकर असलेल्या आकांक्षा यांनी सिडनॅहॅम महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर फ्लोरिडामध्ये विमानोड्डाणाचे धडे गिरवले. त्यांची मोठी बहीण तेजल याही एअर इंडियामध्ये कॅप्टन आहेत.

सिडनॅहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता यावले यांनी आकांक्षाच्या भरारीचे कौतूक करताना सर्वांनाच तिचा अभिमान वाटतो आहे, असे सांगितले.

Mumbaikar Akanksha Sonawane touched skies by making record of flying from North Pole

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com