esakal | मुंबईकरांनो कोविड नियमावलीकडे दुर्लक्ष नको ! | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबईकरांनो कोविड नियमावलीकडे दुर्लक्ष नको !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या कमी झाली असून मुंबईत मात्र अजूनही रुग्ण 400 ते 500 च्या घरात आढळत आहेत. गेल्या सात दिवसांत रुग्णसंख्या 4 वेळा पाचशेच्या पार गेली आहे. शिवाय, चाचणी पॉझिटिव्हीटी दर ही वाढला आहे. त्यामुळे, मुंबईत अद्यापही लेवल थ्री चे नियम लागू आहेत.

दरम्यान, मुंबईत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यातून हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत 3 ऑक्टोबर या दिवशी 573 रुग्ण आढळले होते, त्यानंतर, 4 ऑक्टोबर या दिवशी 339 कोविड रुग्ण आढळले होते. 5 , 6, 7, 8 आणि 9 ऑक्टोबर या दरम्यान अनुक्रमे  427, 624, 453, 529 आणि 510 रुग्ण सापडले. दरम्यान, गेल्या 10 दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जास्त दैनंदिन संख्या लक्षात घेता जवळपास एक महिना 0.06% वर राहिल्यानंतर साप्ताहिक कोविड वाढीचा दर 0.07% पर्यंत वाढला आहे.

मुंबईत 15 ऑगस्टनंतर शिथिल झालेल्या निर्बंधामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. हळूहळू वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊ लागला आहे. 21 ऑगस्ट या दिवशी रुग्ण दुपटीचा कालावधी  2030 दिवसांवर होता. मात्र, दोन महिन्या हाच कालावधी 11 ऑक्टोबर पर्यंत 1,058 पर्यंत घसरला. शिवाय, रुग्ण दुपटीचा दर ही कमी झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.7% पर्यंत झाला आहे.पालिकेचे अधिकारी याबाबत काळजी करत नसून दैनंदिन चाचणीचा पॉझिटिव्ही दर अजूनही 1.2% च्या आसपास आहे आणि गंभीर रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा कमी आहे.”

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, गंभीर रुग्णांची संख्या 298 आहे आणि शहरातील 2,221 कोविड आयसीयू बेडपैकी 25% बेड्स भरलेले आहेत. शहरातील एकूण 18,000 कोविड खाटांपैकी फक्त 10% बेड्स व्यापलेले आहेत.

सध्या मुंबईत नवरात्रोत्सव सुरु आहे. काही दिवसांनी दिवाळीही तोंडावर असून पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता असून त्यात संसर्ग ही वाढण्याची भीती आहे. शिवाय आता प्रवास ही सुरु झाला आहे. लोक ट्रेन, बसमधून प्रवास करुन ठिकठिकाणी फिरत आहेत. पण, अजूनही नागरिक कोविडचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणून पुन्हा कोविड संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे.

हेही वाचा: अतिवृष्टी, पूरामुळे शेतीपिक नुकसानीसाठी ५३ कोटी निधी उपलब्ध

गंभीर रुग्ण कमी -

गणेशोत्सवात झालेल्या गर्दीनंतर मुंबईत रुग्ण वाढतील अशी भीती आहे पण, मुंबईतील गंभीर रुग्णांची संख्या फार कमी आहे. पण, परतलेल्या लोकांवर लक्ष ठेवले पाहिजे. तिथून डेल्टा प्लस किंवा इतर व्हेरिएंट समोर येतो का हे पाहिले पाहिजे. कोणालाही लक्षणे जाणवत असतील तर आयसोलेट करुन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, यातही मृत्यू कमी असल्याने ही संख्या अजूनही नियंत्रणात आहे, पण, दुप्पटीचा कालावधीत कमी होतोय याकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे

असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

मुंबईतील दोन वॉर्ड्स मृत्यूंमध्ये हॉटस्पॉट -

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मृत्यूंची संख्या आता 16 हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबई शहराच्या 24 वॉर्डांपैकी 2 वॉर्ड असे आहेत जिथे सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. या दोन वॉर्डमध्ये मृत्यूंची संख्या सरासरी हजारच्या वर नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील के पूर्व प्रभागात 1267 मृत्यू नोंद करण्यात आले आहेत. तर, एस वॉर्डमध्ये 1,042 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

सर्वाधिक मृत्यू -

  1. के पूर्व - 1267

  2. एस - 1042

  3. आर सी 969

  4. पी दक्षिण - 967

  5. जी उत्तर 835

loading image
go to top