मुंबई भाषिक ध्रुवीकरणाच्या दिशेने

- दीपा कदम
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

भाजपला एकगठ्ठा मतदान करीत शिवसेनेला आव्हान
मुंबई - "हटाव लुंगी बजाव पुंगी' बोलत दाक्षिणात्यांच्या पाठीशी लागणाऱ्या शिवसेनेला क्‍वचितच कधी वाटले असेल, की नेमक्‍या याच अजेंड्यावर मुंबईत विरोधक त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करतील.

भाजपला एकगठ्ठा मतदान करीत शिवसेनेला आव्हान
मुंबई - "हटाव लुंगी बजाव पुंगी' बोलत दाक्षिणात्यांच्या पाठीशी लागणाऱ्या शिवसेनेला क्‍वचितच कधी वाटले असेल, की नेमक्‍या याच अजेंड्यावर मुंबईत विरोधक त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करतील.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मुंबईवर दावा केलेल्या गुजरातला इथल्या गुजराती भाषिकांनी साथ दिली आहे. भाजपला एकगठ्ठा मतदान करत मुंबई कोणाची, हा प्रश्‍न पुन्हा एकदा उभा केला आहे. मराठी मुंबईकरांच्या बालेकिल्ल्याला अखेरीस गुजराती माणसाने भगदाड पाडले आहे. मुंबईतील 38 लाख मराठी मतदारांसमोर गुजराती भाषिक 22 लाख आणि 18 लाख जैन समाजाने मुंबईची राजकीय समीकरणे बदलवत शिवसेनेला मोठे आव्हान उभे केले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लालबाग, परळ, दादर आणि वरळी हे मराठी मतदारांचे गड शिवसेनेने राखले असले, तरी गुजराती, जैन समूहाचे लक्षणीय प्रमाण असलेल्या मतदारांनी भाजपला कौल देत शिवसेनेवर पलटवार केला आहे. गुजरातीबहुल असणाऱ्या बोरिवलीमध्ये 10 पैकी 6 जागा (मतदानाची टक्केवारी 61.5), कांदिवली 13 पैकी 10 जागा (मतदानाची टक्केवारी 57), मुलुंड 6 पैकी 6 जागा (मतदानाची टक्केवारी 60.5) आणि घाटकोपर 7 पैकी 4 जागा (मतदानाची टक्केवारी 54.5) भाजपकडे गेल्या आहेत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर यापूर्वी मराठी माणसाच्या शिवसेनेला मतदान होत असे. आताही मुद्दे तेच आहेत; पण माणूस गुजराती आहे.

लालबाग, परळ, नायगाव, धारावी, माहीम, दादर, वरळी आदी मराठी वर्चस्व असणाऱ्या विभागांतील 35 पैकी 24 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेसाठी त्यात अजून एक समाधानाची गोष्ट म्हणजे मनसेच्या ताब्यातून दादर पूर्ण सोडविण्यात त्यांना यश आले आहे. गेल्या निवडणुकीत मनसेकडे दादरमधील सहापैकी सहा जागा होत्या. मराठीबहुल आणि गुजराती भाषिक अशी सरळसरळ विभागणी झालेल्या यंदाच्या पालिका निवडणुकीत मुंबईच्या बदललेल्या राजकीय समीकरणाने एक वर्तुळ पूर्ण केले आहे.

Web Title: Mumbai's linguistic polarization direction