पार्किंगच्या समस्येत मुंबईची कोंडी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईतील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पार्किंगला जागा न मिळाल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा झाला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुढील वर्षापर्यंत मुंबईत दोन लाख 84 हजार वाहनांच्या पार्किंगसाठी जागा आवश्‍यक आहे. मात्र, सध्याचे सर्व प्रकल्प वर्षभरात पूर्ण झाले, तरी केवळ 70 हजार वाहनांसाठीच अर्थात 25 टक्के जागा उपलब्ध होणार आहे. 

मुंबई - मुंबईतील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पार्किंगला जागा न मिळाल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा झाला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुढील वर्षापर्यंत मुंबईत दोन लाख 84 हजार वाहनांच्या पार्किंगसाठी जागा आवश्‍यक आहे. मात्र, सध्याचे सर्व प्रकल्प वर्षभरात पूर्ण झाले, तरी केवळ 70 हजार वाहनांसाठीच अर्थात 25 टक्के जागा उपलब्ध होणार आहे. 

रस्त्यावरील 92 वाहनतळे अपुरी पडल्याने विकसकांना अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशक देऊन त्यांच्याकडून बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही वाहनतळे पालिकेच्या ताब्यात येण्यास प्रचंड विलंब होत आहे. तब्बल 85 वाहनतळांमधून 70 हजार वाहनांच्या पार्किंगची समस्या सुटणे आवश्‍यक होते. मात्र, आतापर्यंत केवळ 18 वाहनतळेच पालिकेच्या ताब्यात मिळाली आहेत. 

पालिकेने दोन वर्षांपूर्वी मुंबईचा "मोबिलिटी' आराखडा तयार केला होता. त्यातील अंदाजानुसार 2019 पर्यंत मुंबईत दोन लाख 84 हजार आणि 2034 पर्यंत पाच लाख 37 हजार वाहनांच्या पार्किंगकरिता जागेची गरज भासणार आहे. मात्र, सध्या खासगी-सरकारी भागिदारी अंतर्गत सर्व वाहनतळ पालिकेच्या ताब्यात मिळाली, तरी केवळ 70 हजार वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न मिटणार आहे. 

...म्हणून शुल्कवाढ 
सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी यासाठीच वाहनतळांचे शुल्क वाढवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने वर्षभरापूर्वी पार्किंगच्या शुल्कात 100 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ केली. तसेच, घरासमोरील रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठीही पालिकेला शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत मोठी ओरड करण्यात आली होती. मात्र, हे शुल्क वाढवले तरच नागरिक अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

भागिदारीतील वाहनतळ 
- 85 - प्रकल्पांना परवानगी 
- 18 - पालिकेच्या ताब्यात 
- 7 - पालिकेच्या ताब्यात मिळाल्यानंतर 13 हजार वाहनांची सोय 
- 85 - वाहनतळ सुरू झाल्यानंतर 69 हजार 566 वाहनांची सोय 

वाहनतळांसाठी स्वतंत्र प्राधिकरण 
वाहनतळांची सुविधा प्रामुख्याने महापालिकेमार्फत पुरवली जाते. मात्र, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत काही ठिकाणी वाहनतळ चालवली जातात. वाहनतळांसाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी शिफारस महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रस्तावित विकास आराखड्यात केली आहे. राज्य सरकारने याला मंजुरी दिल्यास वाहनतळांचे नियोजन शक्‍य होईल, असा दावा केला जात आहे. 

Web Title: Mumbai's parking problem