मुंबईत रेल्वेचे टीसीही आंदोलन करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पश्‍चिम रेल्वेवरील तिकीट तपासनिसांचा प्रवास भत्ता चार महिन्यांपासून बंद करण्यात आहे. परिणामी ते कधीही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत...

मुंबई : रेल्वे प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून तिकीट तपासनिसांना (टीसी) प्रवास भत्ता देणे बंद केला आहे. परिणामी सर्व टीसी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कोणतेही कारण न देता घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात ऑगस्टमध्ये आंदोलन केले जाईल, असे वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनने सांगितले आहे.

पश्‍चिम रेल्वेचे टीसी लोकल व मेल-एक्‍स्प्रेसमध्येही तिकीट तपासणी करतात. लोकल गाडीत तपासणीचे काम करताना नियोजित मुख्य कार्यालयापासून आठ किलोमीटरहून अधिक प्रवास झाल्यास ग्रेडनुसार त्याचा भत्ता दिला जातो. त्यामुळे तिकीट तपासनिसांना प्रवासादरम्यान काम करण्यास सोपे जाते. परंतु, मार्च ते जून असा चार महिन्यांचा प्रवास भत्ता पश्‍चिम रेल्वेने बंद केला आहे. त्यामागील कारणही सांगितले नसल्याने त्याचा जाब संघटनेने रेल्वे प्रशासनाला विचारला होता. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
 
फेब्रुवारी २०१९ पासून प्रवास भत्ता देणे पुन्हा बंद करण्यात आले आहे. टीसी १०० टक्के दावा प्रवास भत्त्यावर करतात. मात्र, लेखापरीक्षकाने दिलेल्या नोंदीनुसार टीसींना ७० टक्केच प्रवास भत्ता मिळायला हवा. त्यावर या महिन्यात तोडगा काढू, असे आश्‍वासन पश्‍चिम रेल्वेकडून मिळाले आहे.
 
तोडगा न निघाल्यास आंदोलन करणार, असे वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस जे. आर. भोसले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai's Train ticket collector agitation for travel allowance