Mumbai : उन्हाचा फटका त्यात अघोषित भारनियमन, डोंबिवलीकर नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाचा फटका

Mumbai : उन्हाचा फटका त्यात अघोषित भारनियमन, डोंबिवलीकर नागरिक हैराण

डोंबिवली - कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाची 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान नोंद होत आहे. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाण 44 ते 46 टक्के असल्याने उकाडा कमालीचा वाढला आहे.

दुपारच्या वेळेत नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. मात्र भर उन्हातून फिरताना अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच शहरात वेळी अवेळी होणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्या पूर्वीची कामे, रस्त्यांची खोदकामे आणि तांत्रिक बिघाड या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातील बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊन नागरिक आजारी पडत आहेत. कल्याण डोंबिवली शहरातील तापमानाचा पारा हा 35 च्या पुढेच रहात असल्याचे दिसून येत आहे.

रविवारी कल्याण डोंबिवली मध्ये 36 अंश सेल्सिअस तापमान होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी तापमानात वाढ होऊन ते 37 अंश सेल्सिअस इतके झाले. तर आद्रतेचे प्रमाण हे 40 ते 44 टक्के इतके होते. यामुळे उकाडा वाढला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत अंगाची लाहीलाही होत आहे.

तापमान वाढीमुळे अनेकजण दुपारच्या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळत असून यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर वाहनांच्या संख्येत घट झाली असल्याचे दिसून येते. त्यातच कल्याण डोंबिवली मध्ये सुरू झालेल्या अघोषित भारनियमानाचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येते.

शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळ, दुपार, संध्याकाळ असे वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. सकाळच्या वेळेत नागरिकांची कामावर जाण्याची गडबड आणि त्यात लाईट गेल्याने नागरिकांची कामे खोळंबून पडत आहे. दुपारच्या वेळेत लाईट गेल्याने जास्त उकाडा वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे.

दिवसातून अर्धा तास ते पाऊण तासाकरिता वीज पुरवठा खंडीत होत आहे. काही वेळेस दिवसांतून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडीत होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात दुपारच्या वेळेत वीजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हे अघोषित भारनियमनतर नाही ना अशी चर्चाही शहरात सुरू आहे.

डोंबिवली मधील सावरकर रोड, बाजी प्रभू चौक, खांबाळपाडा, ठाकुर्ली, आयरे गाव शहराच्या या भागात विजेचा लपंडाव अधिक होत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीची वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामामुळे तसेच तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे महावितरण सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Pune News