मुंब्रा बायपास आजपासून खुला 

मुंब्रा बायपास आजपासून खुला 

कळवा : तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना अखेर गणपती पावला असून, त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी रस्त्याची पाहणी करून त्याचे उद्‌घाटन करणार असून, त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. मुंब्रा बायपास रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्ता खचला होता. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती होती. त्यामुळे 7 मेपासून दुरुस्ती व नवीन बांधणीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. शीळ-भिवंडी मार्गावरील वाहतूक कल्याण व डोंबिवली शहरातून वळविण्यात आली होती; परंतु त्याचा परिणाम कळवा व ठाणे शहरातील वाहतुकीवर झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक व वाहतूक पोलिसही त्रस्त झाले होते.

दुरुस्तीच्या संथ कामांबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधिकाऱ्यांना झाडले होते, तर मुंब्य्रातील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी 10 सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रवादीला पत्र देऊन गणेशोत्सवाआधी रस्ता सुरू करण्याचे कळविले होते. 

भाजप श्रेय घेणार 

रस्ता दुरुस्तीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना लवकर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, तर रस्ता खुला होण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत पाठपुरावा केला होता. शमीन खान यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप पुढे सरसावला असून, गणेशोत्सवाआधी रस्ता सुरू करून सार्वजनिक बांधकाममंत्री याला हिरवा कंदील दाखवणार आहेत. मुंब्रा बायपास खुला करण्याचे श्रेय भाजपने घेतल्याने शिवसेना व राष्ट्रवादी पिछाडीवर पडल्याचे दिसते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com