प्रसादात विष मिसळून मुंब्य्रात घातपाताचा कट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

मुंब्रा येथील मंदिरातील प्रसादात विष मिसळून घातपात घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप एटीएसने ठेवला आहे.

मुंबई: वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याच्या प्रभावाखाली येऊन अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या १० जणांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले. मुंब्रा येथील मंदिरातील प्रसादात विष मिसळून घातपात घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप एटीएसने ठेवला आहे. 

जानेवारीत एटीएसने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि औरंगाबाद येथून उम्मत-ए-मोहम्मदिया या संघटनेच्या १० जणांना अटक केली होती. मुंब्रा येथील एका टेकडीवर त्यांनी स्फोटके व विष तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि मुंब्रेश्‍वर मंदिरातील महाप्रसादात घातक रसायने मिसळून घातपात करण्याचा कट आखला होता, असा एटीएसचा आरोप आहे. हे आरोपी इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, नाईक याच्या चिथावणीखोर भाषणाच्या प्रभावाखाली होते. नाईकची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओ आरोपींच्या समाजमाध्यमांवरील खात्यात पोलिसांना सापडले आहेत. 
एटीएसने अटक केलेले काही आरोपी परदेशांतील दहशतवाद्यांच्या संपर्कात होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. डिसेंबरमध्ये मुंब्रेश्‍वर मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात महाप्रसादाचे वाटप केले जाते. त्या वेळी प्रसादात विष कालवण्याचा कट आरोपी ताल्हा पोट्रिक याने केला होता. आरोपींनी हल्ले घडवण्याचाही कट  रचला होता. त्यांनी स्फोटके आणि विष तयार करण्याची माहिती इंटरनेटवरून मिळवली होती. आरोपी अबू हमजा या संघटनेचा प्रमुख होता, असा दावा एटीएसने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbra poison in prasad issue