मुंडे-मेटेंचे शक्‍तिप्रदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी मी मेहनत घेतली आहे. हे खाते जनतेचे कल्याण करणारे आहे. माझ्या भावालाच हे खाते मिळाल्याने मला मनापासून आनंद झाला आहे.‘‘
- पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री

मुंडेसमर्थक सोबत असल्याचे पंकजांचे संकेत; मेटे रविवारी भूमिका स्पष्ट करणार
मुंबई - जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर नाराज झालेल्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड, नगर आणि अन्य ठिकाणचे मुंडेसमर्थक नेते आपल्या सोबत असल्याचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले, तसेच मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या विनायक मेटे यांची नाराजी लपून राहिली नसतानाच मेटे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

खांदेपालटात पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खाते ते प्रा. राम शिंदे यांना दिले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची नाराजी लपून राहिली नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनीदेखील पंकजा मुंडे परदेशातून आल्यानंतर नवीन खात्याचा कार्यभार स्वीकारला. पंकजा मुंडे यांचे काल मुुंबईत आगमन झाले असता अडीच ते तीन हजार समर्थकांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. रॉयल स्टोन या सरकारी निवासस्थानी आज समर्थकांचा राबता होता. या वेळी प्रा. राम शिंदे यांचेदेखील आगमन झाले. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी बीडसह नगर आणि अन्य भागांतील मुंडेसमर्थक आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.

राम शिंदे यांचे अभिनंदन
महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण खात्याची मान आणखी उंच करा, अशा शब्दांत शुभेच्छा देऊन पंकजाताई मुंडे यांनी आज नूतन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन केले. जलसंधारण खात्याचा गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर प्रा. शिंदे यांनी आज दुपारी रॉयल स्टोन निवासस्थानी जाऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

विनायक मेटे यांचे उद्या शक्‍तिप्रदर्शन
दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने विनायक मेटे यांनी येत्या रविवारी शक्‍तिप्रदर्शन करीत पुढील भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेल्यांनतर मेटे यांनी भाजपबाबत नाराजी व्यक्‍त केली होती, तसेच त्याचदिवशी विधान परिषद सदस्यत्वाची शपथही न घेता मेटे निघून गेले होते. येत्या रविवारी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मेटे यांनी यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान येथे आयोजित केली आहे. या बैठकीनंतर भाजपसोबत राहायचे किंवा नाही या संदर्भातला निर्णय ते घोषित करणार आहेत.

 

Web Title: Munde mete power display