अनधिकृत गाळ्यांवर नगरपालिकेचा हातोडा

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कारवाईत नागाव मार्गावरील गॅरेज, भाजीची दुकाने, टपऱ्यांचा समावेश 

मुंबई: उरण नगरपालिका  हद्दीतील नागाव येथे इमारतींसमोर अडथळा निर्माण करणाऱ्या १८ अनधिकृत वाढीव गाळ्यांच्या अतिक्रमणावर नगरपालिकाने बुलडोझर फिरवला. यामध्ये काही गॅरेज, भाजीची दुकाने, टपऱ्यांचा समावेश होता.

नागाव मार्गावर इमारतींच्या समोरच अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली होती. अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपऱ्या, दुकाने, गॅरेज आदींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता अनुप कांबळे, उपअभियंता झेड. आर. माने यांच्या पथकाने अडथळा निर्माण करणारी १८ अनधिकृत वाढीव अतिक्रमणे काल पोकलनचा वापर करून हटविली असल्याची माहिती अभियंता अनुप कांबळे यांनी दिली.

नगर परिषदेला तेथे रस्त्याचे काम करायचे आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वीही नोटीस दिली होती; मात्र तरीही अतिक्रमणे न काढल्याने नगर परिषदेमार्फत अनधिकृत अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal action on illigal construction