विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज 

विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज 

नवी मुंबई - पाच दिवसांच्या गणरायाचे उद्या (ता. 17) विसर्जन होणार असल्याने त्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यंदा महापालिकेने मंडळांना मंडपासाठी दिलेली परवानगी आणि पोलिसांनी लाऊड स्पीकरसाठी दिलेल्या परवानगीनुसार सुमारे एक हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिकेने विसर्जन तलाव, निर्माल्य कलश व मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी क्रेन अशा सुविधांची व्यवस्था केली आहे. तर विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करून समाजकंटक आणि रोडरोमियोंवर लक्ष केंद्रित केले आहे. 

दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुमारे एक हजार मूर्तींचे विसर्जन होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी प्रत्येक भागातील विसर्जन तलाव घाटावर जाऊन दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जनस्थळांची साफसफाई व त्या परिसरात आवश्‍यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. बेलापूर विभागात पाच, नेरूळ आणि वाशी विभागात प्रत्येकी दोन, तुर्भेत आणि कोपरखैरणेत प्रत्येकी तीन, घणसोलीत चार, ऐरोली विभाग तीन, दिघा विभागात एक अशा एकूण 23 विसर्जनस्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनकरीता तराफा, तलावांच्या ठिकाणी क्रेन व ट्रॉलीची सुविधा केली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्ड तैनात असतील. सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्‍यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटिंगही तयार केले आहे. तलाव व्हिजनअंतर्गत मुख्य 23 तलावांमध्ये करण्यात आलेल्या इटालियन गॅबियन वॉलच्या रचनेद्वारे मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशिष्ट जागा तयार करण्यात आली आहे. भाविकांनी व श्री गणेशोत्सव मंडळांनी दर वर्षीप्रमाणे याच ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. 

जनरेटर, प्रथमोपचार 
विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था आणि प्रथमोपचार कक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांना माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे. 23 विसर्जनस्थळांवर 700 हून अधिक स्वयंसेवक नेमले असून, तेथे अग्निशमन जवान, लाईफ गार्डस्‌ तैनात आहेत. विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्‍या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवले आहेत. प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था आहे. हा प्रसाद व फळे गरजू मुले व नागरिकांना देण्यात येणार आहे. 

ध्वनिप्रदूषणावर लक्ष 
ध्वनिप्रदूषणविषयक विहित मर्यादा पातळीची मर्यादा सांभाळायची असून, नागरिकांनी इतरांना त्रास होणार नाही यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून खास खबरदारी घेतली जाणार आहे. मर्यादेत ध्वनिपातळी ठेवण्यासाठी पोलिसांकडून ध्वनिप्रदूषण मोजणाऱ्या यंत्राची मदत घेतली जाणार आहे. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी आपल्याकडील मौल्यवान वस्तू व लहान मुले यांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भुरटे चोर व रोडरोमियोंसाठी साध्या वेशातील पोलिस तैनात असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com