अखेर ठाणा कॉलेजने घेतला मोकळा श्वास, महापालिकेने हटवली कोव्हिड सामुग्री

thana college
thana college

ठाणे : ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने 9 जूनला विद्याप्रसारक मंडळाच्या ठाणा महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. दोन आठवड्यापूर्वीच हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारपासून (ता. 10) येथील कोव्हिड सामुग्री हटवण्यास महापालिकेने सुरुवात केली. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर ठाणा कॉलेजने मोकळा श्वास घेतला. 

ठाणे शहरात कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक हॉटेल, बीएसयूपीच्या इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. तथापि, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 9 जूनला ठाणे महापालिकेने विद्याप्रसारक मंडळ शिक्षणसंकुलाच्या 7 इमारती कोव्हिड सेंटरसाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला होता. नियमित शैक्षणिक उपक्रमासह 85 अभ्यासक्रम येथे सुरू असल्याने महापालिकेच्या या निर्णयाला विद्याप्रसारक मंडळाने विरोध केला होता. शैक्षणिक प्रक्रिया सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारल्यास शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र पालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर हा वाद न्यायालयात गेला होता. 

न्यायालयाने महापालिका आणि विद्याप्रसारक मंडळाने आपापसात तडजोड करावी, असे निर्देश दिले होते. या तडजोडीसंदर्भात बैठका होऊनही मार्ग निघत नव्हता. अखेर महापालिकेने 21 जुलैच्या दरम्यान क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतला. परंतु, हा निर्णय मागे घेऊनही जवळपास दोन आठवड्याहून अधिक काळ क्वारंटाईन सेंटरची साधनसामुग्री हलवली नव्हती. ही साधनसामुग्री हलवण्यास आता सुरुवात झाली असून यामुळे ही शैक्षणिक संस्था मोकळा श्वास घेऊ शकणार आहे. विलंबाने का होईना महापालिकेने सामुग्री हटवल्याने विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी समाधान व्यक्त केले. 

(संपादन : वैभव गाटे)

municipal Corporation close the covid centre of thane College

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com