पालिकेच्या नियोजनशून्यतेची "कळ' सामान्यांना 

पालिकेच्या नियोजनशून्यतेची "कळ' सामान्यांना 

मुंबई - नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी अक्षरशः "पाणीबाणी' उद्‌भवली होती. ती एवढी तीव्र होती, की मुख्यालयातील सुमारे तीन हजार कर्मचारी आणि कामानिमित्त तेथे आलेल्या अंदाजे दीड हजार अभ्यागतांना निसर्गाच्या हाकेला ओ देणेही पाचसहा तासांसाठी कठीण झाले होते. कारण पाण्याअभावी पालिकेने दुपारपर्यंत या इमारतीतील सर्व शौचालये कुलुपबंद केली होती. अखेर टॅंकरने पाणी आल्यानंतर ती खुली करण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

शहरात 10 टक्के पाणीकपात लागू आहे. त्याचा फटका पालिका मुख्यालयालाही बसत असून या इमारतीला चार महिन्यांपासून रोज सुमारे दोनतीन टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयातच प्रशासनाला पाण्याचे नियोजन करता येत नसल्याबाबत बभ्रा होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते; पण गुरुवारी ते सर्व प्रयत्न फोल ठरले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या "भातसा'तील विसर्ग झडपेत बुधवारी बिघाड झाला. तो दुरुस्त करण्यात आला असला, तरी गुरुवारी दक्षिण मुंबईसह शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्याचा फटका पालिका मुख्यालयालाही बसल्याने ही परिस्थिती उद्‌भवली. पाणीच नसल्याने या इमारतीतील अनेक शौचालये बंद ठेवण्यात आल्याची नोटीसही चिकटवण्यात आली होती. अखेर दुपारनंतर पाण्याचे टॅंकर आल्यावर ही शौचालये खुली करण्यात आली. 

कारण "तांत्रिक'च! 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या एका मंत्र्याच्या बंगल्याचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. तेव्हा पालिकेने तांत्रिक कारण पुढे केले होते. तेव्हापासून प्रत्येक वेळी पालिका प्रशासन हे कारण देत असते. पालिकेच्या "अ' विभागातील पाणी प्रश्‍नावर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवल्यानंतरही हेच कारण पुढे करण्यात आले होते. गुरुवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com