पालिकेचा झोपडपट्टीतील खत प्रकल्प यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

घरोघरीचा कचरा गोळा करून आणि कचरानिर्मितीच्या ठिकाणीच खत तयार करण्याचा पालिकेचा प्रयोग यशस्वी होत आहे.

नवी मुंबई - घरोघरीचा कचरा गोळा करून आणि कचरानिर्मितीच्या ठिकाणीच खत तयार करण्याचा पालिकेचा प्रयोग यशस्वी होत आहे. तुर्भे येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील पहिला खतकुंडीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. यात साधारण दोन हजार घरांमागे एक टन कचऱ्यापासून खड्ड्यात खतनिर्मिती केली आहे. ते खत स्वयंसेवी संस्था वापरणार आहेत. यामुळे पालिका शहरात आणखी सहा ठिकाणी खतकुंड्या तयार करणार आहे.

नवी मुंबईत दररोज सुमारे साडेसातशे टन कचरा गोळा होतो. यातील सुमारे तीनशे टन सुका आणि साडेतीनशे टन ओला कचरा असतो, परंतु स्वच्छ भारत अभियानांर्गत आयुक्त डॉ. एन. रामास्वामी आणि महापौर जयवंत सुतार यांनी कचरा वर्गीकरणावर भर दिला होता. त्यामुळे शहरातील वर्गीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. सध्या शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी ८५ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते; मात्र ही सवय झोपडपट्टीतील रहिवाशांनाही लागावी यासाठी पालिकेने झोपडपट्टीत दोन हजार घरांमागे एक टनाची खतकुंडी तयार केली आहे. यात पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर तुर्भेतील इंदिरा नगरमध्ये खड्डा खोदला. स्त्री-मुक्ती संघटनेच्या महिलांनी २५० घरांमधील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले. नंतर तो झोपडपट्टीजवळच्या खड्ड्यात टाकला जातो. या कचऱ्यातून त्या प्लास्टिकही गोळा करतात. त्यामुळे त्यांना यातूनही रोजगार मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वीच घनकचरा विभागाने तयार केलेल्या या खड्ड्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. तयार झालेले हे खत स्त्री-मुक्ती संघटनेलाच दिले जाते.

पालिकेची घोडदौड
तुर्भेतील इंदिरा नगर भागातील खतकुंडीचा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर कोपरखैरणे, आडवली-भुतवली, घणसोली, रबाळे, ऐरोलीतील समतानगर, दिघा परिसरात बिंदू माधव नगर, बेलापूरमध्ये रमाबाई आंबेडकर नगर अशा सहा ठिकाणी एक टन क्षमतेच्या खतकुंड्या तयार केल्या जाणार आहेत.

कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण व तो वाहून नेणे यासाठीच्या पालिकेच्या खर्चात या प्रकल्पामुळे बचत झाली आहे. तुर्भे येथील कचराभूमीवरील भारही यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.
- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Web Title: Municipal corporation slum Fertilizer projects are successful