महापालिकेत होणार 1800 पदांवर मेगाभरती 

महापालिकेत होणार 1800 पदांवर मेगाभरती 

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आकृतिबंधाला अखेर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे तब्बल 24 वर्षांनंतर महापालिकेत एक हजार 790 जागांवर मेगाभरती होण्याची शक्‍यता आहे. 

नवी मुंबईतील होतकरू तरुणांना महापालिका सेवेत रुजू होण्याची संधी उपलब्ध होत असतानाच तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यातून चतुर्थ श्रेणी कामगारांची पदोन्नतीची आशा मावळली आहे. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनातील उणिवा भरून काढण्यावर भर दिला. त्यातून महापालिकेतील पदांना सरकारची मंजुरी न मिळाल्याने कारभाराला मर्यादा येत असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन रिक्त व आवश्‍यक पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातून सुमारे तीन हजार 279 पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवून देण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने नगरविकास खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला होता. 

नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यापुढे आयुक्त मुंढे यांनी तीन हजार 279 पदांच्या आकृतिबंधाचे सादरीकरण केले. तसेच महापालिकेला आवश्‍यक पदांची गरज व्यक्त केली. त्यानंतर म्हैसकर यांनी आकृतिबंधाला मान्यता देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

या आकृतिबंधात नव्या 865 पदांनाही मंजुरी दिली असून, महापालिकेसमोरचा पदनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता रिक्त 925 व नव्याने मंजूर 865 पदे अशी एकूण एक हजार 790 जागांवर लवकरच महापालिकेच्या इतिहासातील पहिली मेगा भरती होणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये महापालिकेमध्ये नोकरभरती झाली नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार व होतकरू तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. 

महापालिकेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करण्याच्या सूचना नगरविकास खात्याने दिल्याचे सूत्रांकडून समजते. या निर्णयामुळे महापालिकेतील लिपीक, टेलिफोन ऑपरेटर, स्वागतिका, समाजसेवक, वाहनचालक यांच्यासह इतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीनेच होणार आहे. 

भरतीसाठी निश्‍चित पदे 

विभाग कार्यालये- 356 

परिमंडळ कार्यालये- 28 

प्रशासकीय विभाग- 31 

अतिक्रमण विभाग- 53 

लेखा विभाग- 39 

इतर विभाग- 127 

संवर्गनिहाय पदे 

सहायक आयुक्त- 13 

प्रशासकीय अधिकारी- 14 

कर निरीक्षक- 116 

अधीक्षक, वसुली अधिकारी- 43 

वरिष्ठ लेखा लिपीक- 47 

लेखा लिपीक- 61 

उपअभियंता- 29 

कनिष्ठ अभियंता- 120 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com