म्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार 

म्हाडाच्या झोपडपट्ट्यांमधील 70 हजार शौचकुपांची देखभाल पालिका करणार 

मुंबई - मुंबईत म्हाडाने बांधलेली 70 हजार शौचकूप ताब्यात घेऊन त्यांची देखभाल महापालिका करणार आहे. म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचकूप ताब्यात घेऊन त्याची देखभाल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

म्हाडामार्फत मुंबईत 88 हजार शौचकूप बांधण्यात आली आहेत. त्यातील तीन हजार शौचकूप पालिकेने ताब्यात घेतली आहेत. मात्र, उरलेली शौचकूप म्हाडाने आधी दुरुस्ती करावीत, त्यानंतरच आम्ही ती ताब्यात घेऊ, असा पवित्रा पालिकेने घेतला होता. म्हाडाकडूनही त्यांची दुरुस्ती होत नसल्याने शौचालयांची दुरवस्था कायम आहे. अशा वादात शौचालयांना पालिकेकडून पाणी व वीजपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शौचालयांचा वापर होत नव्हता. अखेर आज त्याबाबतची कोंडी फुटली. 

सुमारे नऊ हजार 450 शौचालये नादुरुस्त आहेत. एक हजार 550 शौचकूप झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमुळे तोडण्यात आली आहेत. शौचालये बांधल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी म्हाडाकडून घेतली जात नाही. ती जबाबदारी पालिकेची असल्याचा दावा म्हाडाकडून केला जातो. 

म्हाडाची शौचालये पालिकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नाहीत, असे कारण पुढे करीत पालिकेने त्यांची जबाबदारी झटकली होती. मात्र, गेल्या वर्षी जुलै महिन्यात नगरविकास सचिवांकडे झालेल्या बैठकीत शौचालये पालिकेने पाच महिन्यांमध्ये ताब्यात घ्यावीत, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यातील नऊ हजार 450 शौचालये म्हाडाने दुरुस्त करावीत, असेही बैठकीत ठरले होते. तरीही उरलेली सुमारे 70 हजार शौचकूप ताब्यात घेण्याबाबत पालिकेची चालढकल सुरू होती; मात्र शौचालयांच्या दुरवस्थेमुळे नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरून प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com