नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - महापालिका सभागृहाबाहेर ठेवलेल्या हजेरी बुकात सही करून चर्चेत सहभागी न होताच पळ काढणाऱ्या नगरसेवकांना आता चाप बसणार आहे. बायोमेट्रिक हजेरी आता सर्वच नगरसेवकांना बंधनकारक आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत सोमवारी (ता. 18) मंजूर झाला आहे.

पालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही वेळ बसून सभागृहाबाहेर ठेवलेल्या मस्टरवर सही केली की दिवसभराची हजेरी लागून भत्ताही लागू होतो. अनेक नगरसेवक तास-दीड तास बसून सभागृहातून काढता पाय घेतात. आता सभागृहात प्रवेश करताना आणि घरी जाताना नगरसेवकांना हजेरी लावावी लागणार आहे. लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.

सभागृहात महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर होताना नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे आहे. अनेक नगरसेवक बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहात केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरतेच उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी पक्षादेश काढावा लागत आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना वेसण घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती.

भत्त्याला कात्री
महापालिका सभागृहाच्या दरवाजांवर बायोमेट्रिक यंत्रणा बसवून तेथे सीसी टीव्ही कॅमेरेही बसवले जाणार आहेत. नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश करताना तसेच बाहेर पडताना पंचिंग न केल्यास त्यांच्या त्या दिवसाच्या भत्त्यात कपात केली जाणार आहे. तसा प्रस्तावही लवकरच आणण्याचा निर्णय गटनेत्यांनी घेतला आहे.

Web Title: municipal corporator biometric presenty