युतीच्या उंटावर शेवटची काडी दादरमध्ये!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जानेवारी 2017

किरीट सोमय्यांच्या पत्नी रिंगणात उतरण्याची दाट शक्‍यता

मुंबई - मुंबईतील दादरचा वॉर्ड क्रमांक १९१ हा शिवसेना आणि भाजपमधील युतीच्या उंटावरील शेवटची काडी ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे युती होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते.

किरीट सोमय्यांच्या पत्नी रिंगणात उतरण्याची दाट शक्‍यता

मुंबई - मुंबईतील दादरचा वॉर्ड क्रमांक १९१ हा शिवसेना आणि भाजपमधील युतीच्या उंटावरील शेवटची काडी ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे युती होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते.

शिवसेनेचा बालेकिल्ला गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी उद्‌ध्वस्त केला होता. हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने देशपांडे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. येथे शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आहे. याच वॉर्डातून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे भाजपचे नियोजन असल्याने युती न झाल्यास दादरमधील लढत रंगतदार होईल. 

मुंबई महापालिकेतील युतीसाठी शिवसेना-भाजपची चर्चा होणार आहे; मात्र त्याआधीच दादर हा १९१ नंबरचा वॉर्ड ‘व्हीआयपी’ ठरला आहे. मनसे आणि शिवसेनेपाठोपाठ आता भाजपही या वॉर्डसाठी आग्रही आहे. भाजपकडून वॉर्ड १९१ साठी पोद्दार कॉलेजच्या प्राध्यापिका आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे या वॉर्डसाठी मनसेकडून गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे. स्वप्ना यांनी निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मनसेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत यांना मैदानात उतरवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी एकमुखाने राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
घाटकोपर भागात वर्चस्व असलेल्या किरीट सोमय्या यांना दादरचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यांनी पत्नी मेधा यांच्यासाठी दादरचा आग्रह धरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपची मते वाढल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. युतीचा जागावाटपाचा जुना फॉर्म्युला फेटाळत शिवसेनेला दूर सारण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेतील शिवसेनेच्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून शिवसेनेची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: municipal election dadar