रात्रीस चाले 'पैशाचा खेळ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

शंभर कोटींहून अधिक रकमेचे वाटप

शंभर कोटींहून अधिक रकमेचे वाटप
मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. आदल्या रात्री म्हणजेच रविवारी आणि सोमवारी मुंबईत पैशांचा पाऊसच पडला. शहरात तब्बल 100 कोटींहून अधिक रकमेची पाकिटे वाटली गेली. अवघ्या तीन- चार तासांत हा व्यवहार झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला. गस्तीवरील पोलिस, विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांची नजर चुकवून ही पाकिटे मंडळे आणि चाळींपर्यंत पोचवली गेली.

मतदानाच्या आदल्या रात्री मुंबईत मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होण्याची शक्‍यता असल्याने निवडणूक आयोगाने खास पथके तयार केली होती. गणवेश आणि साध्या वेशातील पोलिस, आयकर आणि विक्रीकर विभागाचे अधिकारी व पालिका अधिकारी या पथकांत होते. प्रत्येक प्रभागात त्यांची करडी नजर होती. या सरकारी ताफ्यासह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. या साऱ्यांची नजर चुकवून मुंबईत पैशांचा पाऊस पडला. क्रीडा व भजनी मंडळे, चाळी आदी ठिकाणी मध्यरात्रीनंतर ठरलेले पाकीट पोचत होते. प्रत्येक पाकिटात 10 ते 15 हजार रुपये होते. असे प्रत्येक प्रभागातील पहिल्या चार उमेदवारांनी किमान 10 ते 15 लाख रुपये रात्रीच्या अवघ्या काही तासांत खर्च केले. संबंधित उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळवून देण्याची जबाबदारी पाकिटे मिळाल्यावर सोपवण्यात आली.

सोसायट्यांना आश्‍वासने
झोपड्या आणि चाळींमध्येच पाकिटांचे वाटप झाले असे नाही; इमारतींतील रहिवाशांनाही आश्‍वासने मिळाली. इमारतीला रंग काढून देणे, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे यासाठी "टोकन' म्हणूनही काही रक्कम देण्यात आली.

असे होते पाकीट
- मंडळे ः 10 हजार (प्रत्येक उमेदवाराकडून 50 मंडळांना वाटप)
- चाळी ः 15 हजार (प्रत्येक उमेदवाराकडून 50 चाळींना वाटप)

Web Title: municipal election on money