कुर्ल्यात शिवसेना काठावर पास, भाजपची पाटी कोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक चेहऱ्यांना पसंती; कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी

पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक चेहऱ्यांना पसंती; कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी
मुंबई - कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आठ वॉर्डात शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर स्वबळावर लढणाऱ्या भाजपची पाटी कोरी राहिली. शिवसेनेची मक्तेदारी असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेने आघाडी घेतली. एमआयएमने मुसंडी मारलेली असताना वॉर्ड क्रमांक 171 मधून शिवसेनेचा विजय झाल्याने पक्षाला थोडा दिलासा मिळाला.

कुर्ल्यात शिवसेनेचाच विजय हे छातीठोकपणे सांगितले जात असताना पक्षाच्या उमेदवारांना मात्र शेवटच्या फेरीपर्यंत बरीच धडपड करावी लागली. वॉर्ड क्रमांक-168 मध्ये दोन डॉक्‍टर उमेदवारांमधील लढाई चुरशीची ठरली. त्यात, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. सईदा खान आणि शिवसेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांच्यात कॉंटे की टक्कर झाली.

भाजपच्या उमेदवार दीपिका मेदाने यांना 5645 मते मिळाल्याने शिवसेनेला विजयासाठी झुंज द्यावी लागली. अखेर, डॉ. सईदा खान यांनी अनुराधा पेडणेकर यांचा 1583 मतांनी पराभव करत विजय मिळवला. एमआयएमला मिळालेल्या 2723 मतांचा फटकाही शिवसेनेला बसला. वॉर्ड क्रमांक 166 मधील शिवसेनेची जागा मनसेने हिरावली. भाजपचे सुधीर खातू हे पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. त्यांनी 4566 मते मिळवली, तर शिवसेनेच्या उमेदवार मनाली तुळसकर यांना 3509 मते मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार नितेश राजहंस सिंग या नवख्या उमेदवाराने 3509 मते मिळवल्याने शिवसेनेच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. येथे मनसेचे संजय तुराडे यांनी 5664 मते मिळवत विजय मिळवला. एकहाती विजयामध्ये वॉर्ड क्रमांक 163 मध्ये 8009 मते मिळवणारे मनसेचे दिलीप लांडे यांचे नाव घेता येईल. कॉंग्रेसचे उमेदवार मोहम्मद शेख यांनी 6234 मते मिळवली, तरी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना जादा मते घेता न आल्याने लांडे यांचा विजय निश्‍चित झाला.

या निवडणुकीत कुर्ल्यात भाजपच्या उमेदवारांना फारशी चमक दाखवता आली नाही. समाजवादी पक्ष, एमआयएमच्या उमेदवारांनी मते घेतल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा विजय अवघड झाला. वॉर्ड क्रमांक 165 मधून समाजवादीतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या अश्रफ आझमी यांनी विजय मिळवला. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक या वॉर्डातून उभ्या होत्या त्यांना 2917 मते मिळाली. आझमी यांची पत्नी दिलशाद बानू आझमी यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक 167 मधून विजय मिळवला. स्थानिक चेहऱ्याच्या जोरावर कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या.

वॉर्ड क्रमांक 169 मधून शिवसेनेच्या प्रवीणा मोरजेकर 10,299 मते घेऊन जिंकल्या. वॉर्ड क्रमांक-170 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कप्तान मलिक हे विजयी झाले. शिवसेनेच्या दर्शना शिंदे, एमआयएमचे सिराज खान व भाजपच्या उमेदवारांनी अडीच ते तीन हजार मतापर्यंतच मजल मारली. वॉर्ड क्रमांक -171 मध्ये शिवसेनेच्या सान्वी तांडेल यांनी एमआयएमच्या उमेदवाराबरोबर कडवी झुंज देत विजय खेचून आणला. एमआयएमच्या अफसना इमरान खानने 4428 मते मिळवली. पहिल्या फेऱ्यांमध्ये दोघींमध्येच चुरस होती. अखेर, 7 हजार 720 मते मिळवत तांडेल विजयी झाल्या. कुर्ल्यातील या आठ वॉर्डातील नकारार्थी मत (नोटा) बटनाचा वापर 2024 जणांनी केला.

पत्नीचा विजय मोठा
प्रभाग रचना बदल्याने अनेक ठिकाणी पती, पत्नी दोघे उभे राहिले होते. त्यापैकी कॉंग्रेसच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक 167 मधून दिलशाद बानू आझमी आणि वॉर्ड क्रमांक 165 मधून अश्रफ आझमी निवडणूक लढवत होते. निकालानंतर दोघे विजयी झाले. यात दिलशाद बानू 4097 मतांनी तर अश्रफ 2867 मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे दिलशाद बानू या पहिल्यांदाच निवडणूक लढवत होत्या.

Web Title: municipal election result mumbai