ठाण्यात सकाळी निरुत्साह, दुपारी रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे, मुंब्रा, दिवा येथील मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याने सकाळी मतदान सुरू झाले तेव्हा मतदारांमध्ये निरुत्साह होता. सकाळी 10नंतर मात्र मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या. दुपारी 12 पर्यंत हे चित्र होते. त्यात काही केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले.

ठाणे - ठाणे, मुंब्रा, दिवा येथील मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याने सकाळी मतदान सुरू झाले तेव्हा मतदारांमध्ये निरुत्साह होता. सकाळी 10नंतर मात्र मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या. दुपारी 12 पर्यंत हे चित्र होते. त्यात काही केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले.

मतदान केंद्रांपुढे लागलेल्या रांगामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानास मुकावे लागले. तर काही ठिकाणच्या याद्यांमध्ये फोटो एकाचा आणि नाव दुसऱ्याचे असे प्रकार होते. त्यामुळेही अनेकांना मतदान करता आले नाही. मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री न करताच अनेक मतदार केंद्रांवर गेल्याने त्यांची निराशा झाली. काहींनी आपली नावे गायब झाल्याच्या तक्रारीही केल्या.

ठाण्यातील दिव्यप्रभा सोसायटीतील 250 मतदारांपैकी केवळ 50 मतदारांचीच नावे यादीत होती. त्यामुळे 200 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ही सोसायटी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कळवा परिसरातील एका मतदान केंद्रावर यंत्र बिघडल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले होते.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे तीन वेळा प्रशिक्षण झाले होते, तरीही काही कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची कल्पना नव्हती. काही मतदान केंद्रावर पुरवणी याद्या नव्हत्या. कर्मचाऱ्यांना आपण नक्की काय काम करायचे याची कल्पना नव्हती. त्यामुळे पुरवणी यादीतील नवमतदार आल्यावर काय करायचे?, त्याला तत्काळ स्लिप कशी द्यायची? याची कल्पनाच कर्मचाऱ्यांना नव्हती. हे कर्मचारी एकमेकांना विचारून काम करत होते. त्यांचा गोंधळही उडत होता.

काही केंद्रांवर मतदारांनी नावांच्या स्लिप दाखवल्यानंतरही ओळखपत्र मागितले जात होते. तर काही केंद्रांवर मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड वगळता अन्य ओळखपत्र ग्राह्य धरले जात नव्हते. मतदारांच्या बोटाला शाई लावण्याबाबतही गोंधळ होता. मतदान केल्यानंतर शाई डाव्या हाताला लावली जाते. मुंब्रा परिसरातील काही मतदान केंद्रावर ती उजव्या हाताला लावली जात होती.

Web Title: municipal election in thane voting