पैगंबरांच्या जुलूससाठी पालिकेच्या सोयी सुविधा, पालिकेकडून 2 कोटींचा निधी 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त मुंबईत जुलूस काढण्यात येतो. त्यानिमित्ताने महापालिकेने 2 कोटी रुपयाची तरतुद केली आहे.

मुंबई : मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची येत्या रविवारी 10 नोव्हेंबर रोजी जयंती आहे.यानिमित्त दरवर्षी भायखळा खिलाफत हाऊस ते क्रॉफर्ड मार्केट असा लाखो लोकांचा जुलूस काढण्यात येतो. गेले 100 वर्ष असा जुलूस काढण्यात येत आहे.त्यात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होतात.यामुळे पालिकेने डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आणि गणेशोत्सवाप्रमाणे सोयी सुविधा व दोन कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. त्याला आज मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. 

मुस्लिम धर्मीयांचे मोहम्मद पैगंबर हे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. त्यांच्या जायंतीनिमित्त खिलाफत मुव्हमेंट या संघटनेद्वारे दरवर्षी भायखळा येथील खिलाफत हाऊस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हज हाऊस असा जुलूस काढण्यात येतो.या जुलूसच्या मार्गावर मोठ्याप्रमाणात मुस्लिम नागरिक राहतात.त्यामुळे जुलूसमध्ये लाखो लोक सहभागी होतात.या जुलूसचा मार्ग पालिकेच्या ए, बी, सी आणि डी या चार वॉर्डमधून जातो.पालिकेकडून दरवर्षी या चारही वॉर्डमधून प्रत्येकी 25 लाखांची तरतूद केली जात असली तरी पालिकेकडून म्हणाव्या तश्‍या सोयी सुविधा मिळत नव्हत्या. 

जुलूसच्या वेळी पालिकेच्या सोयी सुविधा मिळाव्यात तसेच त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी खिलाफत मुव्हमेंट या संघटनेकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केली होती.त्यानुसार जाधव यांनी पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत सोयी सुविधा आणि दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली.त्याला पालिका प्रशासन आणि सर्व पक्षीय गटनेत्यांनी होकार दर्शविला आहे.गुरुवारी जुलूस दरम्यान कोणत्या सुविधा द्याव्यात याची बैठक आयोजित करण्यात आली होती.महापौर विश्वनाथ महाडेश्वर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थिती बैठक संपन्न झाली. 

या बैठकीत भायखळा खिलाफत हाऊस व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पालिकेद्वारे मंडप उभारण्याचा, या जुलूस दरम्यानच्या मार्गावर मोबाईल टॉयलेट्‌स, आरोग्य सुविधा, डॉक्‍टरांचे पथक, पाण्याची व्यवस्था, अल्पोपहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांना 25 लाख रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे.या जुलूससाठी ए, बी, सी आणि डी या चार विभाग कार्यालयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हा खर्च अधिक झाल्यास पालिकेकडून खर्च केला जाणार आहे. तसेच पुढील वर्षांपासून अर्थसंकल्पात 2 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.या दिवशी या मार्गावर मोफत पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे अशी माहिती महापौर महाडेश्वर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal facilities for the Prophet's julus in mumbai