रुग्णालयांत अग्निसुरक्षा चाचणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

अशी होणार चाचणी
  रुग्णालयातील प्रवेशद्वारांची संख्या 
  रुग्णालयाबाहेर पडायला किती प्रवेशद्वार आहेत?
  रुग्णालयात आग प्रतिबंधक योजना आहे का?

मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. 

पालिका रुग्णालयांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एखाद्या आगीच्या घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर अंधेरीच्या घटनेतून धडा घेत पालिका प्रशासनाने अग्निसुरक्षा चाचणीचा निर्णय घेतला आहे.

प्रमुख पालिका रुग्णालयांपैकी परळमधील केईएम रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला आठ हजारांहून अधिक रुग्ण भेट देतात. त्याखालोखाल शीवमधील टिळक रुग्णालयात पाच ते सात हजारांच्या संख्येत बाह्यरुग्ण विभागात रुग्ण भेट देतात. त्या तुलनेत मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात आणि अंधेरीतील कूपर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. नायर रुग्णालयात अंदाजे पाच हजार तर कूपर रुग्णालयात तीन हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला नोंद होते. रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयांच्या तुलनेत फारच जास्त आहे. शिवाय, रुग्णालयाचा परिसर मोठा असल्यास गडबडीच्या वेळी कुठून बाहेर पडावे? हे समजणे नव्या रुग्णाला फारच कठीण होते. त्याच पार्श्‍वभूमीवर अग्निसुरक्षा चाचणी करून त्याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख रुग्णालयांच्या सर्वेक्षणाचे काम अगोदरपासूनच सुरू झालेले आहे. नर्सिंग होम आणि आरोग्य केंद्रांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अग्निसुरक्षा कोणत्या भागात हवी, याचा आढावा घेतल्यानंतर अहवाल पालिकेला सुपूर्द केला जाईल. पालिकेची प्रमुख रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने आणि आरोग्य केंद्रात अग्निसुरक्षा चाचणी केली जाईल, असेही रहांगदळे म्हणाले.

अग्निसुरक्षा चाचणीचे केंद्र
 नर्सिंग होम - २८ 
 उपनगरी रुग्णालये - १६
 दवाखाने - १७५
 आरोग्य केंद्रे - २०८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Hospital Fire Security Test