पालिका रुग्णालयाचा ‘आयसीयू’ बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

 महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागातील दोन डॉक्‍टरांवर पालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांपासून रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नवी मुंबई -  महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागातील दोन डॉक्‍टरांवर पालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांपासून रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अतिदक्षता विभागातील रुग्णांना मुंबईतील जे. जे. सारख्या इतर सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले; तर मंगळवारी दिवसभरात नवीन रुग्णांना अतिदक्षता विभागात प्रवेश दिला नाही. अतिदक्षता विभागासोबतच अपघात विभागाचा कारभारही वरिष्ठ डॉक्‍टरांऐवजी प्रशिक्षित डॉक्‍टरांकडून चालवला जात आहे.

विकी इंगळे प्रकरणात आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दोन डॉक्‍टरांवर कारवाई केल्यानंतर त्याचे परिणाम हळूहळू वाशी रुग्णालयात दिसू लागले. रुग्णालयात डॉक्‍टरांच्या येण्या-जाण्याच्या; तसेच नाश्‍त्याच्या वेळा आदी बाबींवर प्रशासनाकडून बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केल्याने डॉक्‍टरवर्ग त्रासला आहे. रुग्णालयातच स्वतःच्या नियमांचे राज्य निर्माण करणाऱ्या डॉक्‍टरांच्या मनसुब्यांना रामास्वामींच्या कारवाईने तडा गेल्याने अनेक डॉक्‍टर वैतागले आहेत. डॉक्‍टरांवर कारवाई केल्यामुळे काय परिस्थिती होते, हे प्रशासनाला दाखवण्यासाठी सोमवारपासून अतिदक्षता विभाग बंद केला आहे. प्रशासनाच्या कारवाईत वैद्यकशास्त्र विभागातील दोन डॉक्‍टर निलंबित केल्यानंतर आणखीन दोन डॉक्‍टरांनी राजीनामे सोपवले आहेत. प्रशासनाने त्यांना काम थांबवण्यास नकार दिला असला, तरी त्यांनी काम थांबवल्याचे समजले आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्र विभागाचे डॉक्‍टर नसल्याने दोन दिवसांपासून अतिदक्षता विभाग बंद पडला आहे. 

 रुग्णालयात मंगळवारी चक्क महिला शिपाई रुग्णांच्या बेडवरचे पांघरून आवरताना दिसल्या. तर अतिदक्षता विभागातील उरलेल्या रुग्णांपैकी काहींना मुंबईतील बड्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. वैद्यकशास्त्र विभागातील इतर रुग्णांना सामान्य उपचार विभागात स्थलांतरित करण्यात आले आहे; परंतु दिवसभर अतिदक्षता विभाग बंद असल्याने रुग्णालयात आलेल्या अपघातग्रस्त रुग्णांना प्रवेश दिला जात नव्हता. अपघात विभागातही वरिष्ठ डॉक्‍टरांऐवजी शिकाऊ डॉक्‍टर काम करताना दिसले. 

महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी जबाबदार डॉक्‍टरांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी तत्काळ दुसरे डॉक्‍टर नियुक्त करणे अपेक्षित होते; परंतु वाशी रुग्णालयात वैद्यकशास्त्र विभागाचे डॉक्‍टर नसल्याने सकाळपासून अपघात व अतिदक्षता विभागाचे कामकाज बंद आहे.
- वैशाली नाईक, आरोग्य सभापती,नवी मुंबई महापालिका

वाशी रुग्णालयातील डॉक्‍टरांअभावी अतिदक्षता विभागातील दोन रुग्णांना ट्रॉमा विभागात स्थलांतरित केले आहे. सध्या अतिदक्षता विभागात रुग्ण नाहीत.
- डॉ. दयानंद कटके,मुख्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: Municipal Hospital ICU closed