पालिका रुग्णालये व्हेंटिलेटरवर? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयातील अद्ययावत मशीन बंद असल्याने सर्व रुग्णालये सध्या व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयांमधील दहापैकी पाच व्हेंटिलेटर बंद असल्याने रुग्णालयातील (एनआयसीयू) अतिदक्षता विभाग अनेक महिन्यांपासून बंद आहेत, तर वाशीच्या रुग्णालयामध्ये मुख्य एक्‍सरे मशीन बंद असल्याने पोर्टेबल मशीनवर काम भागविले जात आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत आज हा प्रकार उघड झाला. त्यानंतर स्थायी समितीमधील सदस्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

नवी मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयातील अद्ययावत मशीन बंद असल्याने सर्व रुग्णालये सध्या व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयांमधील दहापैकी पाच व्हेंटिलेटर बंद असल्याने रुग्णालयातील (एनआयसीयू) अतिदक्षता विभाग अनेक महिन्यांपासून बंद आहेत, तर वाशीच्या रुग्णालयामध्ये मुख्य एक्‍सरे मशीन बंद असल्याने पोर्टेबल मशीनवर काम भागविले जात आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत आज हा प्रकार उघड झाला. त्यानंतर स्थायी समितीमधील सदस्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

सर्वसामान्य रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अखेर यासंदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने आश्‍वासन दिले. 

महापालिकेच्या रुग्णालयांना ऑक्‍टोबर 2016 ते एप्रिल 2017 पर्यंत सिलिंडरने गॅसपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यासाठी सुमारे 39 कोटी 40 लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावावर सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिकेकडून वारंवार कंत्राटदाराला मुदतवाढ का दिली जाते, असा सवाल केला. 

महापालिकेच्या हद्दीतील आमदार व खासदारांचा निधी पडून आहे. त्यांच्या निधीचा वापर करून आवश्‍यक यंत्रणा का आणल्या जात नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जे. डी. सुतार यांनी उपस्थित केला. यंत्रणांअभावी जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, अशा शब्दांत स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील यांनी आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांना खडसावले. महापालिकेच्या रुग्णालयात दहापैकी पाच व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती निकम यांनी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रुग्णालयातील (एनआयसीयू) अतिदक्षता विभाग बंद असल्याची कबुलीही त्यांनी दिली. महापालिकेच्या रुग्णालयात काही कर्मचारी मुद्दामहून मशीन बंद करून खासगी पॅथोलॉजी एजन्सीचा व्यवसाय वाढवण्यासाठी महापालिकेच्या रुग्णांना बाहेर पाठवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला. 

महापालिकेकडे आरोग्य तपासणीसाठी प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांना खासगी पॅथोलॉजी एजन्सीकडे पाठविले जाते. त्या एजन्सीकडून केंद्र सरकारने निश्‍चित दरापेक्षा तिपटीने दर आकारून लूट केली जात असल्याचा आरोप मढवी यांनी केला. अशा पद्धतीने लूट सुरू असल्याच्या आरोपाला डॉ. निकम यांनी कबुली दिली. आता पुढील निविदांमध्ये केंद्र सरकारच्या दरांप्रमाणे कर आकारण्याची तरतूद नव्याने करणार असल्याचे निकम यांनी सांगितले. त्यावर संतापलेल्या सभापती शिवराम पाटील, एम. के. मढवी व जयवंत सुतार यांनी निकम यांना आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारीपदावरून दूर करण्याची मागणी केली. त्या वेळी रुग्णालयांना आवश्‍यक यंत्रणा खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रुग्णालयात सर्व सुविधा सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिले. 

कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर 

महापालिकेला सिलिंडरने गॅसपुरवठा करण्याचा 39 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासोबतच "वे टू हेल्थ'मार्फत होणाऱ्या चाचण्यांसाठी दोन कोटी 32 लाख अतिरिक्त खर्चाला मान्यता मिळाली; तर ऐरोलीतील जिजाऊ रुग्णालयात 13 लाख 18 हजारांच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली.

Web Title: Municipal hospitals on ventilators