महापालिकेच्या उत्पन्नात 27 लाखांची भर 

महापालिकेच्या उत्पन्नात 27 लाखांची भर 

नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण वाढल्याने तीनही उद्यानांतून एप्रिल महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 27 लाख रुपयांची भर पडली आहे. 

नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांना विरंगुळ्याकरिता नोडनिहाय तब्बल 245 उद्याने तयार केली आहेत. प्रत्येक उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी खेळणी, ज्येष्ठांना चालण्यासाठी ट्रॅक, शोभेची फूलझाडे, हिरवा गालिचा तयार केला आहे. ही सर्व उद्याने सध्या मुलांना लागलेल्या सुट्यांमुळे भरलेली असतात. सकाळी व संध्याकाळी मुलांचा उद्यानांमध्ये कल्ला सुरू आहे. कुटुंबासह फिरायला जायचे असेल, तर वाशीतील मिनी सी-शोअर परिसरातील नौकाविहाराला अनेक कुटुंबांकडून पसंती दिली जात आहे. या ठिकाणी खाडीतील पाण्यात नौकाविहारादरम्यान संध्याकाळच्या रम्य वातावरणाचा आनंद लुटता येतो. नौकाविहार करून आल्यावर कुटुंबात लहान मुले असतील, तर त्यांना नजीकच्या मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेनची सफरही घडवून आणता येते. येथील टॉय ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे एप्रिल महिन्यात तब्बल 16 हजार 520 रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. तसेच रस्त्यावर घोडागाडी व घोडेस्वारीचाही आनंद लुटता येत असल्याने वाशीतील हा परिसर सध्या गजबजलेला आहे. 

नेरूळमध्येही बच्चे कंपनीकडून जगातील सात आश्‍चर्यांच्या प्रतिकृती असलेल्या वंडर्स पार्क आणि यातील खेळण्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. वंडर्स पार्कमधील तळे, ऍम्फी थिएटर, टॉय ट्रेन, आकाशपाळणा या खेळण्यांमध्ये मजा करता येत आहे. तसेच उद्यानातील जागतिक सात आश्‍चर्यांसमोर उभे राहून सेल्फी घेण्याचा आनंद घेता येत आहे. 

नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यानातही बच्चे कंपनीसोबत आबाल-वृद्धांची गर्दी होत आहे. या ठिकाणी लावलेली फुलझाडे, टॉय ट्रेन, नीटनेटका जॉगिंग ट्रॅक यामुळे नागरिकांची गर्दी होत आहे. महापालिकेच्या तीनही उद्यानांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये मिळालेल्या उत्पन्नापेक्षा एप्रिल महिन्यात सर्वात जास्त उत्पन्नाची भर पडली. मे महिन्यात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. 

संत गाडगेबाबा उद्यान 
महिना - तिकिटातून मिळालेले उत्पन्न 
जानेवारी - 5 हजार 282 
फेब्रुवारी - 47 हजार 838 
मार्च - 62 हजार 283 
एप्रिल - 74 हजार 622 

वंडर्स पार्क 
जानेवारी - 22 लाख 37 हजार 515 
फेब्रुवारी - 14 लाख 69 हजार 450 
मार्च - 21 लाख 7 हजार 535 
एप्रिल - 25 लाख 91 हजार 575 

मीनाताई ठाकरे उद्यान 
जानेवारी - 6 हजार 255 
फेब्रुवारी - 11 हजार 220 
मार्च - 13 हजार 365 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com