पालिकेच्या विद्यार्थ्यांना यंदाही वेळेवर गणवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जूनच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक साहित्य

जूनच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक साहित्य
मुंबई - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळेल. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी दिली.

मुंबईत पालिकेच्या एक हजार 195 शाळा आहेत. या शाळांत साडेतीन लाख विद्यार्थी आहेत. त्यांना पालिका 27 प्रकारचे शैक्षणिक साहित्य देते. त्यासाठी दर वर्षी कोट्यवधींची तरतूद केली जाते. गतवर्षी शैक्षणिक साहित्यासाठी 98 कोटी 18 लाख आणि गणवेशासाठी 31 कोटींचा खर्च करण्यात आला होता. या शाळांतील बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणाऱ्यांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्‍यक शैक्षणिक साहित्य दिले जाते; मात्र त्यासाठी मुलांना वर्षभर वाट पाहावी लागते. त्यावरून पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत, तसेच पालिकेच्या सभागृहात खडाजंगी झाली.

गतवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले होते. यंदाही या साहित्यासाठी मुलांना वाट पाहावी लागणार नसून जूनच्या पहिल्या आठवड्यात साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल अशी तयारी पालिका प्रशासनाने केली आहे, असे गुडेकर यांनी सांगितले.

Web Title: municipal student uniform