पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नवी मुंबई - बहुप्रतीक्षित महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नवी मुंबईतील हे पहिलेच अत्याधुनिक पशुरुग्णालय असेल. 

नवी मुंबई - बहुप्रतीक्षित महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नवी मुंबईतील हे पहिलेच अत्याधुनिक पशुरुग्णालय असेल. 

पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने शहरातील भटक्‍या आणि पाळीव प्राण्यांवर वैद्यकीय उपचार होत नव्हते. महापालिकेकडून परवाना घेऊन कुत्र्यांचे संगोपन करणारे सुमारे पाच हजारपेक्षा अधिक श्‍वानप्रेमी आहेत. सरकारी उपचार पद्धती नसल्यामुळे त्यांच्या कुत्र्यांना उपचारासाठी खासगी डॉक्‍टरांकडे जावे लागते. मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी तर थेट मुंबईच गाठावी लागते. मात्र आता महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय उभारले जाणार असल्याने सर्व सवलती माफक दरात मिळणार आहेत. 

पशुवैद्यकीय विभागाने रुग्णालयाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यानुसार आर. झेड मालपानी यांना रुग्णालय उभारण्यासाठी 4 कोटी 78 लाख 59 हजार 308 रुपयांच्या कामाला परवानगी दिली आहे. जुईनगर सेक्‍टर 24 मधील भूखंड क्रमांक 5 आणि 6 वर पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. 920.774 चौरस मीटर क्षेत्रफळ आकाराच्या भूखंडावर दोन मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. 

तळ मजल्यावर प्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग असणार आहेत. पहिल्या मजल्यावर लहान आकाराच्या पशूंसाठी विभाग असणार आहे, तर दुसऱ्या मजल्यावर प्रयोगशाळा आणि डॉक्‍टरांसाठी आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. 

काय असेल पशुवैद्यकीय रुग्णालयात 
- औषधे वाटप विभाग 
- डॉक्‍टर रूम 
- क्ष-किरण विभाग 
- शस्त्रक्रिया खोली 
- बाह्यरुग्ण विभाग 
- लसीकरण कक्ष 

पक्ष्यांनाही मिळणार उपचार 
दिवाळी व होळी आणि रंगपंचमीसारख्या सणात पक्ष्यांना दुखापत होते. या जखमी झालेल्या पक्ष्यांनाही पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर अशा पक्ष्यांसाठी विशेष कक्ष तयार केले जाणार आहे. 

Web Title: municipal veterinary hospital finally solved