पालिकेच्या शिट्टीचा आवाज बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवरील कारवाई थंडावली असून, पहाटेच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाजणारी शिट्टीही आता बंद झाली आहे. त्यामुळे झोपडपट्टीमधील रहिवासी डोंगर भागासह रेल्वे ट्रॅकवर उघड्यावर शौचास जात असल्याने, शहर हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेचे तीन तेरा वाजले आहे.

मुंबई ः नवी मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवरील कारवाई थंडावली असून, पहाटेच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाजणारी शिट्टीही आता बंद झाली आहे. त्यामुळे झोपडपट्टीमधील रहिवासी डोंगर भागासह रेल्वे ट्रॅकवर उघड्यावर शौचास जात असल्याने, शहर हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेचे तीन तेरा वाजले आहे.

माजी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी स्वच्छ भारत अभियानात देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यासाठी पालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजल्यापासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कामाला जुंपले होते. स्वत: आयुक्तदेखील पहाटेच्या वेळी शहरामध्ये फेरफटका मारून शहर स्वच्छ आहे का नाही? याची खातरजमा करत होते. 

स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरातील असणाऱ्या शौचालयाची देखील पाहणी करून शौचालयांमध्ये साफसफाई ठेवण्यात येत होती. मात्र, झोपडपट्टीमधील रहिवाशांनी शौचालयांचे असणारे नळ तोडणे, विजेचे दिवे चोरणे, शौचालयाचे कमोड तोडणे असे प्रकार समाजकंटकांकडून करण्यात येत होते. तसेच पहाटेच्या वेळी एमआयडीसीच्या भूखंडावर अनधिकृतपणे डोंगराच्या कुशीत राहत असणारे विष्णुनगर, इलठणपाडा, यादवनगर, तुर्भे, रबाळे येथील रहिवासी उघड्यावर शौचालयास जात होते. त्यामुळे पालिकेकडून उघड्यावर शौचालयास जाणाऱ्याकडून १२०० रुपये तर लघवी करणाऱ्यांकडून २५० रुपये दंड आकरण्यात येत होता; तर पालिकेचे गुड मार्निग पथक हे पहाटेच्या वेळी शिट्टी वाजवून शौचायलास बसणाऱ्यावर जरब बसवत होते. त्यामुळे उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. 

मात्र, पालिकेकडून कारवाई थंडावल्याने पुन्हा उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांचे प्रामाण वाढले आहे. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त तुषार पवार यांचाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

पालिकेने झोपडपट्टीमध्ये उत्तम प्रकारचे शौचालय बांधून दिले आहे. पण पालिका कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेळी पहाटे फिरत असताना झोपडपट्टी भागातील डोंगर भागामध्ये उघड्यावर शौचलयासाठी जाणारे घाबरत होते. मात्र, पालिकेचे कर्मचारी हे पहाटेच्या वेळी फिरणे बंद झाल्यापासून उघड्यावर झोपडपट्टी रहिवाशांनी बसण्यास सुरुवात केली आहे.
- नितीन माने, नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal whistle blows off