धोकादायक इमारतीवर पालिकेची कारवाई

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

तांत्रिक बिघाडामुळे काम धीम्या गतीने; शेजारील रहिवाशांना मनस्ताप

पनवेल : कळंबोली वसाहतीमधील सेक्‍टर- ३ येथील रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला होता. धोकादायक झालेली ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडू नये, याकरिता इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेने त्या वेळी घेतला असला, तरी पाडकामासाठी होणारा खर्च कोणी करायचा, या वादामुळे इमारतीचे पाडकाम रखडले होते. अखेर इमारतीमधील सदनिकाधारकांच्या संस्थेविरोधात पालिकेने कळंबोली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याने संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

पुण्यावरून खास क्रोकोडाईल मशीन मागवण्यात आली असून रविवारपासून तोडक कारवाईला सुरुवात झाली. रविवारी उशिरा सुरू झालेल्या कामादरम्यान इमारतीच्या काही भागाचे पाडकाम पूर्ण करण्यात आले असून सोमवारी सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. सोमवारी सुरू करण्यात आलेल्या कामादरम्यान मशीनमध्ये तीन वेळा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे या इमारतीच्या शेजारील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. इमारत पाडताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने शेजारील इमारतींमधील महिलांना घराबाहेर पडून विनाकारण इमारतीचे पाडकाम पाहत बसावे लागत आहे. 

सदनिकाधारकांना नोटिसा
धोकादायक इमारत कोसळून शेजारील इमारतींना इजा पोहोचण्याची शक्‍यता लक्षात घेत पालिकेच्या वतीने आजूबाजूच्या इमारतीमधील जवळपास ६० सदनिकाधारकांना तात्पुरत्या स्वरूपात घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालिकेच्या नोटिशीनंतरही येथील काही रहिवासी जीव मुठीत धरून मागील चार ते पाच दिवसांपासून इमारतीतच वास्तव्य करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality action on hazardous building