शहरभर झळकलेले राजकीय बॅनर उतरले

शहरभर झळकलेले राजकीय बॅनर उतरले
शहरभर झळकलेले राजकीय बॅनर उतरले

मुंबई : राज्यात निवडणूक निकालानंतर फलकबाजीला ऊत आला होता. सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे अभिनंदन करणारे अवैध फलक झळकावले होते. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पालिकेने पहिल्याच दिवशी शहरातील अनेक बेकायदा फलक उतरवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे अनेक फलक ‘मातोश्री’समोरील पदपथांवर लावण्यात आले होते. ते सर्व फलक उतरवून पदपथ मोकळे करण्यात आले.  

विधानसभा निवडणूक निकालानंतर शहरात अनधिकृत फलक आणि बॅनरबाजीचे पेव फुटले. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाकडून आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री होणार असल्याचे फलक अनेक ठिकाणी झळकले होते. त्यामुळे शहराला बकाल स्वरूप आले होते. मात्र, पक्षांच्या आणि नेत्यांच्या दबावामुळे अनधिकृत फलकांवर कारवाई होत नव्हती. मात्र, मंगळवारपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पालिका प्रशासन कार्यरत झाले असून त्यांनी शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सकाळपासूनच सर्वच २४ प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यासाठी पालिकेने विशेष पथके तयार केली आहेत. त्यांच्या माध्यमातून पालिकेने कारवाई सुरू केली. फलक हटवण्याची कारवाई दिवसभर करण्यात आली. मात्र, एकूण किती अनधिकृत फलक हटवले याची कोणतीही आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नव्हती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com