पाणीविक्रीवर वचक

पाणीविक्रीवर वचक

मुंबई - अघोषित पाणीकपातीच्या काळात पाण्याची बेकायदा विक्री होत असल्याचे आढळून आल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी पालिकेने आता टॅंकरद्वारे अधिकृत पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३५२ टॅंकर तैनात करण्यात आले आहेत; मात्र टॅंकर कुठे भरला जाणार आणि कोणत्या विभागात कोणत्या सोसायटीला पाण्याचा पुरवठा होणार, याची नोंद ठेवण्यासाठी टॅंकरवर ‘व्हीटीएमएस’ उपकरण लावण्यात येणार आहे. त्याद्वारे टॅंकरचा पाठलाग होणार आहे.

पाणीटंचाईचा फायदा उठवण्यासाठी मुंबईत सध्या टॅंकर लॉबी सक्रिय झाली आहे. पाणीटंचाईचा फटका मुंबईतील अनेक भागांना बसू लागला आहे. पाण्याच्या वेळा आणि पुरवठ्यात कपात केल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवत आहेत. रहिवाशांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कमालीचा असंतोष आहे. विहिरी, बोअरवेल आणि पालिकेच्या पाण्यासाठी अवाच्या सवा दर आकारून टॅंकर लॉबी आपले उखळ पांढरे करून घेत आहे. टॅंकर लॉबीला पालिकेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही. पालिकेच्या पाण्याची बेसुमार बेकायदा विक्री होत असल्याचे आढळून आल्यामुळे अवैध पाणी विक्री रोखण्यासाठी पालिका सरसावली आहे.

शहर आणि उपनगरांत पाणीटंचाई असलेल्या भागांतील नागरिकांनी मागणी केल्यास अधिकृत टॅंकरचा पुरवठा केला जाईल, तशी तयारी पालिकेने केली आहे. जास्त पाण्याची आवश्‍यकता असल्यास किंवा काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्याने नियमित पाणीपुरवठा बाधित झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्‍यकता असल्यास टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

असा होणार टॅंकरचा पाठलाग
टंचाईचा फटका बसणाऱ्या भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे २८ टॅंकर तैनात केले आहेत. ते कोणत्या ठिकाणाहून पाणी भरत आहेत आणि कुठे पाणीपुरवठा करतात याची खात्री करण्यासाठी पालिकेच्या २८ टॅंकरमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरणे यापूर्वीच बसवण्यात आली आहेत. त्यामुळे आता ज्या सोसायटीला पाण्याचा टॅंकर पाठवण्याची परवानगी मिळाली असेल, तिथेच टॅंकर गेला असल्याची खात्री करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त जल अभियंता खात्याच्या अखत्यारीतील ३२४ वाहनांमध्येही असे उपकरण लवकरच बसवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com