ठाण्यातील कुत्र्यांवर पालिकेची उधळपट्टी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्न दिवेसेंदिवस बिकट होत आहे. महापालिकेकडून वर्षानुवर्षे या कुत्र्यांची नसबंदी केली जात असली तरी या कुत्र्यांच्या संख्येवर अद्याप तरी नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. असे असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेने तब्बल एक कोटी ५५ लाख ७० हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्न दिवेसेंदिवस बिकट होत आहे. महापालिकेकडून वर्षानुवर्षे या कुत्र्यांची नसबंदी केली जात असली तरी या कुत्र्यांच्या संख्येवर अद्याप तरी नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. असे असताना आता पुन्हा एकदा ठाण्यातील कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेने तब्बल एक कोटी ५५ लाख ७० हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरून आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत वाद होण्याची शक्‍यता आहे.
    
२६ डिसेंबर २०१६ रोजी तीन वर्षाकरिता कुत्र्याच्या नसबंदीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. पण या कामाची मुदत संपत आल्याने नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. पण मुळात अशाप्रकारे नसबंदी करण्यात आलेल्या कुत्र्यांचा लेखाजोखा मात्र महापालिकेच्या सभागृहासमोर मांडणे टाळण्यात आले. याबाबतचा एक कोटी ५५ लाख ७० हजार रुपयांचा प्रस्ताव वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. तसेच मंजुरीसाठी सभागृहासमोर सादर केला जाणार आहे. पण या गोषवाऱ्यामध्ये यापूर्वी कोणत्या वर्षी किती कुत्र्यांवर किती शस्त्रक्रिया करण्यात आल्या, याचीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच आरोग्य विभागाचा हा विषय वादाचा ठरणार आहे.
    
महापालिकेच्या हद्दीतील तब्बल ५८ हजार ५३७ कुत्र्यांवर तब्बल १४ वर्षात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के भटक्‍या कुत्र्यांची संख्या असते. त्यानुसार ठाणे शहरातील आजची लोकसंख्या २६ लाखांपर्यंत पोहोचलेली असल्याने भटक्‍या कुत्र्यांची संख्या ७८ हजारांपर्यंत गेलेली आहे. एवढेच नव्हे तर एवढ्या कमी प्रमाणात शस्त्रक्रिया होत असताना १४ वर्षात तब्बल ५८ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्या कशा? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नियंत्रण राहणार कसे?
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दर महिन्याला जास्तीत जास्त ३०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. म्हणजे वर्षाला सुमारे तीन हजार ६०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर तीन वर्षात १० हजार ८०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या आणि महापालिकेकडून शस्त्रक्रियेसाठी ठेवण्यात आलेल्या लक्ष्यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच एक कुत्री दर सहा महिन्यानंतर नव्या पिल्लांना जन्म देत असल्याने एवढ्या मंदगतीने कुत्र्यांची शस्त्रक्रिया केल्यास त्यावर नक्की नियंत्रण राहणार कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality uproar over Thane dogs!