हॉर्न वाजवण्याच्या वादातून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

वाहनाचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि चौघे जखमी झाले.

मुंबई : वाहनाचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तरुणाने केलेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि चौघे जखमी झाले. विद्याविहार परिसरात गुरुवारी (ता. ८) घडलेल्या या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विद्याविहार पूर्व येथील मोहन नगरमधील बंजारा वस्ती येथून दीपक चावरिया (२९) व त्यांचा भाऊ मनोज (३२) मोटरसायकलवरून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जात होते. अरुंद गल्लीतून जाताना दीपक यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला. त्यामुळे तेथे राहणारा संदीप पारचा (२८) व त्याचे वडील पालसिंग पारचा (७०) यांना राग आला. त्यांनी दीपक व मनोज यांना शिवीगाळ केली. या दोघांनी जाब विचारल्यावर पारचा पिता-पुत्रांनी धक्काबुक्की केली. 

दीपक व मनोज यांचे वडील मनोहर चावरिया (५७), बहीण पूजा (३६) यांनी पारचा पिता-पुत्राला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, संदीप पारचा याने घरातून चाकू आणून दीपक, मनोज, पूजा व मनोहर चावरिया यांच्यावर हल्ला केला. त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात मनोहर चावरिया यांच्या डाव्या बरगडीजवळ गंभीर जखम झाली व अन्य तिघेही जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान मनोहर चावरिया यांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MURDER BECAUSE CONFLICT OF HORN NOICE

टॅग्स