तीन वर्षांच्या नातीसह आजीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई -  तीन वर्षांच्या नातीसह आजीची हत्या करून घरातील साडेतीन लाखांचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशाल श्रीवास्तव (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. विशाल हा हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर आहे. 

मुंबई -  तीन वर्षांच्या नातीसह आजीची हत्या करून घरातील साडेतीन लाखांचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. विशाल श्रीवास्तव (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. विशाल हा हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधर आहे. 

शिव कोळीवाडा येथे राहणाऱ्या रंजना नागोटकर यांच्या डोक्‍यात लोखंडी सळई मारून व गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांची नात वैष्णवी ही झोपेतून जागी झाली आणि रडू लागली असता विशालने तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर घरातील कपाटातील साडेतीन लाख रुपयांचे दागिने आणि चार हजार रोख रक्कम घेऊन विशाल पसार झाला होता. 3 जून 2011 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्येच्या घटनेत पोलिसांनी आरोपी विशाल श्रीवास्तवला कलम 302, 452, 397 अन्वये अटक केली होती. या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देताना सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्याआधारे आरोपी विशालला दोषी ठरविले होते. सत्र न्यायाधीश सलमान आजमी यांनी विशालला जन्मठेपेच्या शिक्षेसह 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

कोणी ओळखू नये म्हणून साडी डोक्‍यावर टाकून विशाल इमारतीच्या आवारातून बाहेर पडताना लिफ्टमनने पाहिले होते. तसेच ज्या सोनाराकडे दागिने विकायला गेला होता ते दागिने पोलिसांनी जप्त केले होते. सोनाराची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली होती. नागोटकर कुटुंबीयांच्या वतीने गणेश अय्यर यांनी बाजू मांडताना तीन वर्षांच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा विकृत आहे. ही दुर्मिळ केस असून त्याला फाशी द्यावी, अशी मागणीही सरकारी वकील मंगेश आरोटे यांनी न्यायालयात केली. विशालने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री पूर्ण केली होती; पण हाती पैसा नसल्याने तो चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला आणि त्याच्या हातून दोन हत्या झाल्या, असे आरोपपत्रात होते. 

Web Title: murder case in mumbai