उल्हासनगर - जमिनीच्या वादातून दाम्पत्याची हत्या

दिनेश गोगी
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

उल्हासनगर : आपापसात नातेवाईक असलेल्यांमध्ये निर्माण झालेल्या जमिनीच्या वादातून एका दाम्पत्यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अंबरनाथच्या ग्रामीण भागात घडली आहे. विशेष म्हणजे लग्नाला मोटरसायकलवर निघालेल्या या दाम्पत्याला टँकरखाली चिरडून ठार मारण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील पो.मलंगवाडी नाऱ्हेण गावात राहणारे शेंद्रे व पाटील या नातलग असलेल्या कुटुंबियात जमिनीवरून वादविवाद सुरू होते. जमिनीच्या वादावरून विलास पाटील, विनोद पाटील, बाळाराम पाटील व विलास यांच्या पाण्याच्या टॅँकरवर असणारा चालक यांनी कैलास शेंद्रे यांचा काका वासुदेव शेंद्रे (वय 50) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पाळत ठेवली. वासुदेव हे पत्नी रेखा(40) हिच्यासोबत मोटरसायकलवरून बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास लग्नाला जात होते. त्यावेळी बाळेगाव एसआरपीएफ कॅम्पच्या मेनगेटच्या अलिकडून नाऱ्हेण शिवार येथे पाठीमागून भरदाव वेगाने टॅँकरने येऊन त्यांच्या मोटरसायकलला उडवून त्यांच्या अंगावरून टँकर नेऊन दांपत्याला चिरडून ठार मारले.

या घटनेची माहिती हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे, पोलीस निरीक्षक एस.के.जाधव यांना मिळताच त्यांनी  पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वासुदेव व रेखा या  दांपत्याचा जागिच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याठिकाणाहून टँकर जप्त केला आहे.

ही घटना घडल्यावर टँकरचालक त्याठिकाणाहून पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन टँकरचालक अरविंदकुमार कोरी(22) याला ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी कैलास शेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिस ठाण्यात विलास पाटील, विनोद पाटील, बाळाराम पाटील व टॅँकरचालक अरविंदकुमार या चौघांविरूध्द या दुहेरी हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंदकुमार याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हाजर केले असता 2 मे पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिन्ही पाटील फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती असलेल्या घनश्याम पलंगे, सुनिल जाधव यांनी दिली.

Web Title: murder of couple on land issue