उल्हासनगरात 8 किलोच्या गांजासह नगरचा पेंटर ताब्यात

दिनेश गोगी
सोमवार, 10 डिसेंबर 2018

उल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे. 
 

उल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे. 

शहाड रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा सौदा होणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र पवार, राजकुमार सौदागर, रामचंद्र जाधव, नवनाथ वाघमारे, प्रितम भोगले, बाबूलाल जाधव, दादासाहेब भोसले यांनी शहाड रेल्वे परिसरात सापळा रचला. 

एक 33-34 वर्षीय इसम ट्रॅव्हलिंग बॅग सोबत स्थानकाच्या बाहेर आल्यावर तो संशयास्पद रित्या फिरू लागला. कुणाची तरी प्रतिक्षा करत असल्याचे गुन्हे अन्वेषणच्या निदर्शनास आल्यावर साध्या पेहरावात असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची झडती घेतल्यावर पेपरमध्ये गुंडाळलेला 8 किलो गांजा मिळून आला. आरोपीचे नाव योगेश दिनकर असून तो रोकडोबा वाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर मधील राहणारा आहे. तो व्यवसायाने पेंटर आहे. न्यायालयाने त्याला 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याने किती किलोचा गांजा आणला होता? हा कोठून आणला? कोणाला विकला? उल्हासनगरात कोणाशी गांजाचा सौदा ठरला होता? याची आरोपी कडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
 

Web Title: The nagar painter with 8 kg of ganja in Ulhasanagar