नागभीड नगर परिषदेसाठी 24 मे रोजी मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नेवासा, रेणापूर, शिराळा नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नेवासा, रेणापूर, शिराळा नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई - नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगर परिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. नगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध 18 नगर परिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 24 मे 2017 रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले, की संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे रोजी होईल. 11 मेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

Web Title: nagbhid nagar parishad 24th may election