फक्त रुग्णांसाठी, जलमय परिसरातही नायर रुग्णालयातले डॉक्टर कर्तव्यासाठी तत्पर

भाग्यश्री भुवड
Thursday, 24 September 2020

नायर रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरात किमान गुढघाभर पाणी भरले. सर्व वॉर्ड्स पाण्याखाली गेले. मात्र, या ही परिस्थितीवर मात करत डॉक्टरांनी आपली सेवा बजावत रुग्णांच्या प्रति आपले कर्तव्य पार पाडले. 

मुंबई: पाणी शिरूनही, सर्व स्टाफ कामात, कर्तव्यात कोणतीही कुचराई नाही हा अनुभव आला आहे नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना. कोरोना युद्धात मानवी निर्मित अडथळे पार करताना डॉक्टरांच्या नाकी नऊ येत असतानाच बुधवारी डॉक्टरांना निसर्ग आपत्तीला ही सामोरे जावे लागले. तरीही त्यावर मात करून रुग्णसेवेचे व्रत डॉक्टरांनी सुरूच ठेवले. 

नायर रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरात किमान गुढघाभर पाणी भरले. सर्व वॉर्ड्स पाण्याखाली गेले. मात्र, या ही परिस्थितीवर मात करत डॉक्टरांनी आपली सेवा बजावत रुग्णांच्या प्रति आपले कर्तव्य पार पाडले. 

 

बुधवारी पडलेल्या पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली. यावेळी नायर रुग्णालय परिसर कंबरे एवढ्या पाण्याखाली आला होता. डॉक्टरांना एका वॉर्ड मधून दुसऱ्या वॉर्ड मध्ये जाता येत नव्हते. कंबरे एवढ्या पाण्यात गेल्यास कोरोना रुग्ण तपासताना महत्वाचा मानला जाणारा पीपीई किट भिजून जाण्याची अधिक भीती होती. अशावेळेस एका डॉक्टरला दुसऱ्या वॉर्ड पर्यंत जाण्यास चक्क स्ट्रेचरची मदत घ्यावी लागली. पीपीई किट न घातलेल्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना स्ट्रेचरवर ढकलून वॉर्ड पर्यंत सोडण्याची शिकस्त करावी लागली. कोरोना योद्धयांचा कोरोना विरोधातील लढा दिवसेंदिवस कठीण होताना दिसत असला तरी 'आमचे कशा वाचून काही अडत नाही, आम्ही हा लढा जिंकणारच' असे कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नातून दिसत आहे.

आतापर्यंत नायर, केईएम आणि सायन या पालिका रुग्णालयांचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीपीई किट घातलेल्या डॉक्टरला स्ट्रेचरवर बसून साचलेल्या पाण्यातून दुसऱ्या वॉर्डमध्ये नेतानाचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून पुन्हा एकदा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. 

नायर हॉस्पिटल मध्ये पावसामुळे पूर्ण ओपीडी जलमय झाली. पण तरीही सर्व स्टाफ न थकता आपले कर्तव्य बजावत दिवसातून चार शिफ्ट करत आहेत. मी सध्या एम आयसीयूमध्ये दाखव असून याचा साक्षीदार आहे. नायर मधील सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, स्विपर मामा, मावशी सर्वांचे मनःपूर्वक आभार.

महेंद्र रोकडे , रुग्ण, नायर रुग्णालय

रोकडे यांनी ही माहिती ट्विट करुन नायर रुग्णालयात काम करणार्या डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. 

काल सकाळपासूनच मुंबईतील अनेक सखल भागात पाणी पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली. याचा फटका नायर रुग्णालयालाही बसला. तंबूमधील ओपीडीतही पाणी शिरले. विभागात रुग्णांची गर्दी विशेष नसली तरी औषधे, तपासणीची वैद्यकीय सामग्री भिजायला लागल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. येथे ठेवलेली वैद्यकीय सामुग्रीही पाण्याने वाहून बाहेर आली होती. रुग्णालयातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रुग्णालय आवारात कमरेभर पाणी भरल्याने निवासी डॉक्टरांना रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागला. रुग्णालयाबाहेर जाणे शक्य नसल्याने रात्रपाळीचे काही कर्मचारी पुढील पाळीत काम करत असल्याचे मार्ड प्रतिनिधींनी सांगितले. 

दरवर्षी पडणाऱ्या पावसात नायर रुग्णालय अशाच प्रकारे पाण्याखाली जाते. तरीही रुग्णालयाच्या परिसरात यावर्षी अधिक पाणी जमले होते. आणि याच कंबरेभर साचलेल्या पाण्यातून डॉक्टरांनी आपली सेवा बजावली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील पाणी ओसरल्यानंतर सर्व कर्मचारी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत असे ही मार्ड प्रतिनिधींनी सांगितले आहे.

---------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Nair Hospital Doctors Working for patients in waterlogged areas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nair Hospital Doctors Working for patients in waterlogged areas