यादीत नाव इकडे, अन्‌ केंद्र तिकडे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदारसंघांतील हजारो मतदारांची नावे नियोजित मतदान केंद्रात आली नसल्याने मतदारांचे  हाल झाले. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी आल्याने त्रासामध्ये आणखीनच भर पडली. यामुळे निवडणूक आयोगाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदारसंघांतील हजारो मतदारांची नावे नियोजित मतदान केंद्रात आली नसल्याने मतदारांचे  हाल झाले. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी आल्याने त्रासामध्ये आणखीनच भर पडली. यामुळे निवडणूक आयोगाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

आदल्या दिवशी मतदार आपले नाव कुठे व कोणत्या मतदार यादीत आहे, याची माहिती घेत असतो. अशाच प्रकारची माहिती घेत असताना हजारो मतदारांची नावे आपल्या घरापासून खूप लांब असलेल्या मतदान केंद्रावर उपलब्ध असल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या कुटुंबातील नावे एकाखाली एक अशी होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत मात्र एकाच कुटुंबातील नावे विविध मतदान पत्रिकेत गेल्याने निवडणुकीत मतदान करण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करावे लागले.

मतदान केंद्र हे मतदारांच्या घराजवळ असणे अशी अपेक्षा केली जाते; परंतु आजच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराच्या घरापासून तीन, चार, पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मतदान केंद्रात नाव आल्याने मतदारांचे हाल झाले.

ऑनलाईन अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज भरला होता. पत्ताही योग्यप्रकारे भरला होता; मात्र, नाव रामनगर, दिघा येथील मतदान केंद्रात आहे. त्यामुळे चार किलोमीटरवर असणाऱ्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.
- अमर शिंदे, नवी मुंबई.

कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान पालिका शाळा क्रमांक ७६ मध्ये आहे; तर काही नावे न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोलीमध्ये आहेत. हे न समजण्यापलीकडे आहे.
- मनू सकपाळ, घणसोली.

मतदार यादीत घोळ झाला असे म्हणू शकत नाही, त्याला ‘घोळ’ हा शब्द वापरणे चुकीचे आहे. याशिवाय सध्या वेळ कमी असल्याने याबाबत स्पष्टीकरण करता येणार नाही.
-अभय करगुटकर, निवडणूक अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Names in the list here, the other centers there!