फक्त एका लिंकवर क्लिक अन् तरुणीची पीएम केअरच्या नावे ऑनलाईन फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या पीएम केअर्स फंडातून 1 हजार रुपये देण्यात येत असल्याची थाप मारून एका भामट्याने तरुणीला घातला ऑनलाइन गंडा

नवी मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या पीएम केअर्स फंडातून 1 हजार रुपये देण्यात येत असल्याची थाप मारून एका भामट्याने नवीन पनवेल भागात राहणाऱ्या तरुणीच्या बँक खात्यातून 28 हजार रुपयांची रक्कम फोन पे मधून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.  

नक्की वाचा : 'एसटी'चा काखेत कळसा आणि गावाला वळसा; थर्मल मशीनच्या वापराबाबत महिनाभरानंतर आली जाग...

या घटनेतील 25 वर्षीय तक्रारदार तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, ती नवीन पनवेल भागात राहण्यास आहे. गत आठवड्यात तरुणी आपल्या घरामध्ये असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या मोबाईलवर संपर्क साधून लॉकडाऊनमुळे पीएम केअर्स फंडातून तिच्या बँक खात्यात 1 हजार रुपये पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. यावर तरुणीने अशा प्रकारची योजना ऐकण्यात आली नसल्याचे व त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे, असे सांगताच फोनवरील व्यक्तीने तो पीएनबी बँकेतून बोलत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास 1 हजार रुपये तिच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले. भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या मोबाईल फोनवर फोन पे सुरू झाले. त्यानंतर भामट्याने सांगितल्यानुसार तरुणीने फोन पे चा पासवर्ड टाकल्यानंतर तिच्या फोन पे मधून 1 हजार रुपये वजा झाले. 

हे ही वाचा : लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

तरुणीने ही बाब फोनवरील अज्ञात व्यक्तीला सांगितल्यानंतर त्याने ती रक्कम त्याच्याकडे आली नसल्याचे सांगून तिला पुन्हा व्हॉट्सऍपवर तीच लिंक पाठवून त्याला क्लिक करण्यास भाग पाडले. असे भामट्याने या तरुणीला दहा वेळा लिंक पाठवून त्याद्वारे तिच्या बँक खात्यातून आठ वेळा प्रत्येकी 1 हजार रुपये तर दोन वेळा 10-10 हजार रुपये अशी एकूण 28 हजारांची रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून घेतली. मात्र, त्यानंतरही भामट्याने ती रक्कम त्याच्याकडे आली नसल्याचे सांगत तरुणीला पुन्हा-पुन्हा तीच लिंक पाठवून तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने खांदेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

महत्वाची बातमी : घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...

दरम्यान, संशयित लिंकबाबत www.reportphishing.in व www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून केले आहे. 

 

 Names of PM Cares Online fruad of a young woman


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Names of PM Cares Online fruad of a young woman