मुंबईचे माजी नगरपाल चुडासामा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक व मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता. २३) निधन झाले. चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. भाजप प्रवक्‍त्या शायना एनसी यांचे ते वडील होते. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात नानांचे भरीव योगदान होते.

‘फोरम अगेन्स्ट ड्रग्ज अँड एड्‌स’, ‘नॅशनल किडनी फाउंडेशन’, ‘मुंबई माझी लाडकी’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय सामाजिक योगदान दिले. जाएंट्‌स इंटरनॅशनल या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही संस्था भारतासह विदेशातही प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांवर टिप्पणी करणारे मरिन ड्राइव्ह येथील त्यांचे फलक चांगलेच गाजले. २००५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

चुडासामा यांच्या निधनाने राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. चुडासामा यांनी मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. ‘हरित आणि स्वच्छ मुंबई’ मोहिमेसाठी योगदान देत असतानाच त्यांनी ‘आय लव्ह मुंबई’ या मोहिमेच्या माध्यमातून वृक्षारोपणातही सहभाग घेतला. चुडासामा यांच्या निधनाने आपण जागरूक मुंबईकर गमावला, अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी दिली. चुडासामा यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांशी बांधीलकी जपली होती. अनेक कार्यकर्त्यांना त्यांची साथ लाभली, असे मुख्यमंत्री म्हणाले. रविवारी सायंकाळी चुडासामा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Nana Chudasama Passed Away