‘नाणार’चे आंदोलन म्हणजे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ - विखे पाटील

संजय शिंदे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

मुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरू असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपशी केलेल्या एका‘डिल’चा भाग असून, हे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे. परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप मस्तकी यायला नको म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरूवातीला या प्रकल्पाची रदबदली करून काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा, असे हे कारस्थान असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. या प्रकरणामध्ये भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकिकडे शिवसेनेचे उद्योग मंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात. तर दुसरीकडे भाजपचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते, हा दुटप्पीपणा असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Nanar Agitation Means BJP Shivsenas Match Fixing Says Vikhe Patil