'अँटी चेंबर' वार्तालापाने शिवसेना मंत्री शांत

संजय मिस्कीन
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणेनंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी मात्र मिठाची गुळणी धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यासोबत अँटी चेंबरमध्ये वार्तालाप करत विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवले.

मुंबई - बहुचर्चित नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणेनंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी मात्र मिठाची गुळणी धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यासोबत अँटी चेंबरमध्ये वार्तालाप करत विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारच्या सभेत प्रकल्पाला कठोर विरोध केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना मंत्री कोणता पवित्रा घेतात, याची उत्सुकता लागली होती. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, नाणार प्रकल्प रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना रद्द करणारी प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर शिवसेनेच्या पाच मंत्र्यांनी थेट बैठकीत न जाता मुख्यमंत्री दालनातील अँटी चेंबरमध्ये जाणे पसंत केले. इकडे भाजपच्या मंत्र्यासोबत मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली होती. शिवसेना मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला की काय, अशी शंका भाजपच्या मंत्र्यांनी व्यक्‍त केली. मात्र, पहिल्या निर्णयावर चर्चा सुरू असताना अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठक थांबवली व ते अँटी चेंबरमध्ये गेले. तेथे शिवसेना मंत्र्याशी त्यांनी नाणारबाबत चर्चा केल्याचे समजते. मी त्यांना नाणारची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र दिल्याची माहिती स्वत: देसाई यांनी दिली. मात्र, दहा ते पंधरा मिनिटांच्या चर्चेनंतर शिवसेनचे मंत्री बैठकीला हजर झाले. अँटी चेंबरमध्ये नेमकी काय चर्चा झाली, मुख्यमंत्र्याची नेमकी भूमिका काय, याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळाली नाही.

प्रक्रिया सुरू - सुभाष देसाई
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला. उद्योग विभागाच्या सचिवांना त्याबाबतचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. अधिसूचना काढण्याचा अधिकार उद्योग मंत्र्याकडे असेल तर तो रद्द करण्याचाही अधिकार "एमआयडीसी'च्या नियमानुसार उद्योगमंत्र्यांनाच असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही यासाठीचे पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nanar project anti chamber shivsena minister