नाणारच्या समर्थकांची पत्रकार परिषद उधळली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - नाणार प्रकल्प व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. नाणार प्रकल्प कोकणचा भाग्यविधाता असल्याने तो व्हायलाच हवा या मागणीसाठी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आयोजकांना आपण कुठल्या गावचे आहात, आपली जमीन या प्रकल्पात जाणार आहे काय, असे प्रश्‍न केले.

त्यावर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ही मंडळी बाहेरची आहेत, त्यांचे या प्रकल्पाशी काही देणे घेणे नसल्याचे सांगत ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तेथे झेंडे घेऊन शिरले. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीचे प्रमुख अशोक वालम यांनीही काही प्रश्‍न उपस्थित केले. एकाच वेळी प्रकल्पाचे दोन विरोधक छोट्या सभागृहात शिरले. काही सजग नागरिकांनी या प्रकरणात पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून तक्रार केली; मात्र पोलिस यायच्या आधीच हा संपूर्ण प्रकार आटोपला. नंतर सेंगर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, हा प्रकार निषेधार्ह आहे.

प्रकल्पाला विरोध करायचा असेल, तर तो अशा प्रकारे करण्यात येऊ नये, असे सांगितले. हा प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. वालम यांनी हा मंच भाजप नेते प्रमोद जठारांच्या इशाऱ्यावरून स्थापन केला आहे, असा आरोप केला.

Web Title: nanar project supporter reporter conferance swabhimani party