राणेंच्या आत्मचरित्राचा मुहूर्त अनिश्‍चित?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मूळ इंग्रजीत असलेल्या आत्मचरित्राची मराठी आवृत्तीही तयार आहे; पण प्रकाशनाला मुहूर्तच मिळेना अशी वेळ आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे राणेंनी दिलेल्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणाचा स्वीकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.

मुंबई - स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मूळ इंग्रजीत असलेल्या आत्मचरित्राची मराठी आवृत्तीही तयार आहे; पण प्रकाशनाला मुहूर्तच मिळेना अशी वेळ आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे राणेंनी दिलेल्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणाचा स्वीकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, अशी शिवसेनेची अपेक्षा 
आहे.

हार्पर कॉलिन्सने इंग्रजी पुस्तक विक्रीसाठी उपलब्धही केले आहे; पण मराठी भाषेतील या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुहूर्त मिळालेला नाही. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर जाण्याची धमकी दिली होती, ते माझ्याविरोधात होते,’ असा तपशील या पुस्तकात दिला असल्याने भाजपच्या कोणत्याही नेत्याने या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहू नये, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. शिवसेनेच्या सत्ताकाळात मुख्यमंत्रिपदावर असलेल्या मनोहर जोशी यांनी या पुस्तकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ठाकरे कुटुंबाच्या कृपेने राज्यातील सर्वोच्च पद मिळाले, आता त्यांच्यावर जाहीर टीका करणे हे योग्य नसल्याचे मत मनोहर जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्‍त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजर राहावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. ८ मे ते १० मेच्या आसपास हा कार्यक्रम व्हावा अशी आखणी होती. मात्र मराठी प्रकाशनाच्या समारंभाची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही, असे राणे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, त्यांना वेळ मिळाला की प्रकाशन होईल, असे स्वत: नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Narayan Rane Autobiography Politics Uddhav Thackeray