कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा जल्लोषात साजरी

नवी मुंबई ः समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला.
नवी मुंबई ः समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला.

नवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनाऱ्यांसह, कोळीवाड्यांत बुधवारी (ता.१४) मोठा उत्साह पाहायला मिळाला. ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, सारसोळे जेट्टी, बेलापूर दिवाळे गावासह समस्त कोळीवाड्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.

सारसोळे कोळीवाडा येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीत सोन्याचा नारळ ठेवून वाजतगाजत पालखी सारसोळे खाडीच्या दिशेने रवाना झाली. कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांचे पारंपरिक पेहराव, दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या वेळी पारंपरिक संगीताच्या तालावर अनेकांनी ठेका धरला.

सणासाठी खाडीजवळील जेट्टीच्या परिसराची साफसफाई करण्यात आल्याने जेट्टीला नवीन रूप आले होते. बुधवारी सकाळी नारळाची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सारसोळे कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ यांनी केले होते. कोळी समाजातील पुरुष, महिला आणि लहान मुले पारंपरिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. शिरवणे, दिवाळे या ठिकाणी ही मिरवणूक काढण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com