
Mumbai : नालेसफाई न झाल्याने मुंबई तुंबणार; पहाणीदौऱ्यानंतर नसीम खान यांचा आरोप
मुंबई : नालेसफाई करणारे ठेकेदार व महापालिकेचे काही अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने यावर्षीही पावसाळ्यात मुंबई तुंबेल असा दावा माजीमंत्री व काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी आज नाले पहाणी दौऱ्यादरम्यान केला.
साफसफाईच्या नावाखाली या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही नसीम खान यांनी केला. खान यांनी आज मुंबईत लहानमोठ्या नाल्यांच्या सफाईकामाची पहाणी केली. मिठी नदीचीही व्यवस्थित सफाई न केल्याचे खान यांनी सांगितले.
अनेक नाल्यांमध्ये सहा फूट गाळ असूनही फक्त वरवरचा एक फूट गाळ काढल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी लहान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचेही त्यांना दिसून आले.
क्रांतीनगर-बैल बाजार परिसरात सहार विमानतळाच्या भिंतीजवळील मिठीनदी मधील गाळ खालपर्यंत काढलेला नाही. तसेच मुंबईत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून तेथे अत्यंत मंदगतीने काम सुरु आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीला जोराचा पाऊस आल्यास मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबेल, अशीही भीती खान यांनी व्यक्त केली.
त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांना ट्विट करून नालेसफाई वेगाने आणि व्यवस्थित प्रकारे व्हावी अशी मागणी केली आहे. या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी तसेच मुंबईतील रस्त्यांची कामे त्वरेने पूर्ण करावीत अशा मागण्याही खान यांनी केल्या आहेत.